बुलडाणा, दि. १९- जिल्ह्यात तूर व कापूस पीक मोठय़ा प्रमाणात आहे; परंतु गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने पिकांवर कीड रोगाचा प्रादुर्भाव निर्माण होण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरणामुळे कपाशीवर पांढरी माशी, फुलकिडे व तूर पिकावर पाने गुंडाळणार्या अळीचा धोका निर्माण झाला आहे. बदलत्या हवामानामुळे खरीप पीक संकटात सापडत आहे. त्यामुळे शेतकर्यांची चिंता वाढत आहे. सध्या जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने तूर व कपाशी या पिकांवर परिणाम जाणवत आहे. कपाशी या पिकावर फुलकिडे व पांढरी माशीचा धोका निर्माण झाला आहे. फुलकिडे हे अत्यंत लहान असतात. ते भिंगाच्या सहाय्याने पहावे लागतात. फुलकिडे दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे काळ्या रंगाचे फुलकिडे याला कॅलिओथ्रिप्स इंडिकस म्हणतात आणि दुसरे पिवळसर पांढर्या रंगाचे फुलकिडे याला फ्रॅक्लीनिओन शुल्टझी म्हणतात. काळ्या फुलकिड्यामुळे झाडाच्या खालच्या पानावर वरच्या बाजूने अतिशय पांढरे ठिपके पडतात. तर पिवळसर पांढर्या रंगाच्या फुलकिड्यांमुळे खालच्या बाजूने पाने काळपट तर वरच्या बाजूने कोकडल्यासारखी व कडक होतात. व्यवस्थित पानाचे निरीक्षण केल्यास त्यावर काळ्या रेघा किंवा जळाल्यासारखा भाग दिसतो. काळे फुलकिडे पानाच्या वरच्या पृष्ठ भागावर असल्याने पाऊस पडल्यास वाहून जातात, मात्र पिवळे फुलकिडे झाडावरील मधल्या व कोरड्या पानाच्या खालच्या भागात राहतात. त्यामुळे जोराचा पाऊस किंवा पानाच्या खालच्या बाजूने फवारणी केल्यास त्याचा नाश होतो. ढगाळ वातावरणात पांढर्या माशीचा सुद्धा प्रादुर्भाव वाढू शकतो. कापसाच्या कोवळ्या पानावर खालच्या बाजूने पांढरी माशी अंडी घालते. अंडी घालताना मादी मेणासारखा पांढरा पदार्थ पानावर सोडते. त्यामुळे अंडी पानावर चिकटतात. जास्त अंडी घातली असल्यास पाने खालच्या बाजूने पांढरट दिसतात. परिणामी कपाशी पिकाचे नुकसान होते.
ढगाळ वातावरणाने किडीचा प्रादुर्भाव
By admin | Published: September 20, 2016 12:06 AM