बुलढाणा: कोरोना संसर्गाच्या संदर्भाने बुलडाणा येथील स्त्री रुग्णालयात असलेल्या क्वारंटीन रुग्णांना कथितस्तरावर योग्य सुविधा मिळत नसल्याचा बनावट व्हीडीओ तयार करून तो समाज माध्यमांवर प्रसारीत केल्याप्रकरणी मलकापूरचे नगराध्यक्ष अॅड. हरीश रावळ यांच्या विरोधात बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात १८ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साथ रोग प्रतिबंधक कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमांच्या कलमाचा आधार घेत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुलडाणा येथील स्त्री रुग्णालयामध्ये जिल्ह्यातील संदिग्ध रुग्ण आणि कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांना ठेवण्यात येते. तेथील रुग्णांना योग्य पद्धतीने सुविधा मिळत नसल्याबाबतची एक चित्रफीत नगराध्यक्ष अॅड. हरिश रावळ यांनी काढून समाज माध्यमांवर ती प्रसारीत केली होती. १२ एप्रिल रोजी ही घटना घडली होती.
दरम्यान, संबंधीत चित्रफीत जिल्ह्यातील समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली होती. प्रकरणी जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे आणि तहसिलदार संतोष शिंदे यांना स्त्री रुग्णालयाची पाहणी करून समाजमाध्यमावर प्रसारीत करण्यात आलेल्या व्हीडीओ मधील सत्यतेची पडताळणी केली. दरम्यान, यासंदर्भातील सविस्तर अहवाल हा जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आला होता. त्यामध्ये संबंधीत अहवालावरून जिल्ह्यातील हॉस्पीटल क्वारंटीन म्हणून स्त्री रुग्णालय (जिल्हा सामान्य रुग्णालय) येथील व्यवस्था ही व्यवस्थित असल्याचे निदर्शनास आले. त्यावरून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे कृत्य नगराध्यक्ष अॅड. हरीश रावळ यांनी केल्याच्या कारणावरून या प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांनी बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.जिल्हाधिकारी यांनी प्रकरणी आदेश दिले होते. प्रकरणात आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलम ५२, ५४ आणि साथ रोग प्रतिबंदक कायद्याच्या कलम तीन आणि तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (क) नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १७ एप्रिलच्या मध्यरात्री व १८ एप्रिल उजाडतांना बुलडाणा शहर पोलिसांनी प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रदीप साळुंके हे करीत आहेत. दरम्यान, या संदर्भात वरिष्ठ पोलिस अधिकाºयानेही अनुषंगीक गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती ‘लोकमत’शी बोलताना दिली.
कारणे दाखवा नोटीसही होती बजावली
अॅड. हरीश रावळ यांना या प्रश्नी जिल्हाधिकारी कार्यालयाने दोन दिवसापूर्वी एक कारणे दाखवा नोटीसही बजावली होती. त्याबाबत त्यांच्याकडून स्पष्टीकरणही मागण्यात आले होते.