लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : कोरोना विषाणू संक्रमण कालावधीत मध्यप्रदेश, गुजरात आणि छत्तीसगड येथे सुरू असलेल्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स धारकांकडून नियमांची पायमल्ली करीत वाहतूक केली जात आहे. या बसेसमध्ये फिजीकल डिस्टंन्सिगचे पालन न करता वाहतूक केल्या जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.कोरोना विषाणू संक्रमण लॉकडाऊन कालावधीत खासगी ट्रॅव्हल्स बसेस बंद होत्या. अनलॉक कालावधीत खासगी बसेसना काही अटींवर प्रवासी वाहतूक करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार आंतरजिल्हा आणि आतंरराज्य खासगी बस वाहतूक सुरू करण्यात आली आहे. या खासगी ट्रॅव्हल्सच्या संचालक आणि चालकांकडून शासन आणि कोरोना आपातकालीन परिस्थितीत तयार करण्यात आलेल्या नियमांचा भंग करण्यात येत असल्याचा प्रकार ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये समोर आला आहे.
असे केले स्टिंग आॅपरेशन!खामगाव शहरातून जाणाºया खासगी बसेसचे वेळापत्रक मिळविण्यात आले. त्यानुसार बस थांबत असलेल्या ठिकाणी भेट देण्यात आली. यावेळी सूरत येथे जाण्यासाठी तिकीटाची विचारणा केली. बस येताच बसमध्ये जात चित्रीकरण करण्यात आले. त्यावेळी बसमध्ये एकाच सीटवर दोन प्रवासी आढळून आले. तर या सीट मागील सीटवरही दोन प्रवासी आढळून आले. तर मध्यप्रदेशातील उज्जैनमध्ये जाणाºया बसच्या केबीनमध्ये चक्क कोंबून प्रवासी बसविल्याचे निर्दशनास आले.
नांदुरा पोलिसांची कारवाई!खामगाव येथून सूरत(गुजरात) येथे प्रवासी वाहतूक करणाºया ट्रॅव्हल्समध्ये नियमांचे भंग करून वाहतूक केल्याप्रकरणी गत आठवड्यात नांदुरा पोलिसांनी संबंधित ट्रॅव्हल्सच्या चालकावर कारवाई केली. यामध्ये शारिरीक अंतर न ठेवणे, मास्क न लावण्यासारखे गंभीर प्रकार समोर आले. मध्यप्रदेशात जाणाºया एका खासगी बसमध्ये तर अक्षरक्षा कोंबून वाहतूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. परिणामी, वाहतूक पोलिसांनी चालकाला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला.