गेल्या काही महिन्यांपासून शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणावर मोकाट डुकरांचा सुळसुळाट झाल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरला होता. गुरुवारी शहरातील वार्ड क्रमांक १२ मधील एका नऊ वर्षीय मुलीला एका डुकराने गंभीर स्वरूपाचा चावा घेतल्याने या परिसरातील संतप्त झालेल्या नागरिकांनी चक्क नगरपरिषदेवर धडक दिली होती. मुख्याधिकारी सचिन गाडे, नगराध्यक्ष कासम गवळी, उपाध्यक्ष जयचंद भाटीया, आदींना भेटून संबंधित डुकरांच्या मालकावर पोलीस कारवाई करून डुकरांची इतर ठिकाणी व्यवस्था करण्याची मागणी केली होती. यावेळी मुख्याधिकारी सचिन गाडे, नगराध्यक्ष कासम गवळी यांनी या घटनेची तत्काळ दखल घेत शुक्रवारपासून शहरात डुकरे पकडण्याची मोहीम राबविणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे संतप्त जमाव शांत झाला होता. शुक्रवारी शहरातील विविध भागांत नगरपरिषदेच्या वतीने डुकरे पकडण्याची मोहीम सुरू करण्यात आली. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी आरोग्य कर्मचारी विशाल शिरपूरकर, बुद्धू गवळी, संतोष हिवाळे, आदी परिश्रम घेत आहेत.
मेहकर येथे डुकरे पकडण्याची मोहीम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 4:35 AM