खामगाव : हुतात्मा वीर जगदेवराव सहकारी सूत गिरणीतील गैरव्यवहाराबाबत शेअरधारकासह ‘आप’ संघटनेचे जिल्हा संयोजक डॉ. नितीन नांदुरकर यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात जनहितयाचिका दाखल केली आहे. मलकापूर, नांदुरा, व मोताळा तालुक्याअंतर्गत येणारी हुतात्मा वीर जगदेवराव सहकारी सूत गिरणी ही मागील काही वर्षापासून वादाच्या भोवºयात सापडली आहे. कामगारांचे थकीत वेतन, निवृत्त कर्मचाºयांना न मिळालेला लाभ, गिरणीतील मशिनींची नियमबाह्य विक्री, हिना ट्रेडिंग कंपनीसोबत झालेला गैरव्यवहार, हायवेमध्ये गेलेल्या जमिनीचा मोबदला प्रकरण, माजी संचालकांकडून झालेले भ्रष्टाचाराचे आरोप, निवडणूकीदरम्यान झालेली न्यायालयीन लढाई अशी अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. शेतकºयांच्या हितासाठी सुरु झालेली ही सूतगिरणी आज अत्यंत बिकट परिस्थितीत आहे. या सर्व प्रकाराची शासनामार्फत अनेकदा चौकशीही करण्यात आली. परंतू त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे या सूत गिरणीमध्ये आजपर्यंत झालेल्या गैरप्रकारांची निष्पक्ष चौकशी होवून दोषींवर कारवाई होण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहितयाचिका दाखल करण्यात आली आहे. ही याचिका सूतगिरणीचे शेअरधारक रामराव काशिराम कळसकार (रा. तिकोडी), आम आदमी पार्टीचे जिल्हा संयोजक डॉ. नितीन वसंतराव नांदुरकर (रा. नांदुरा), विर जगदेवराव यांचे चरित्र लेखक मुकूंद विश्वनाथ चोपडे (रा. कोळंबा) यांनी दाखल केली आहे. यामध्ये प्रतिवादी म्हणून वस्त्रोद्योग मंत्रालयाचे सचिव, संचालक सहकारी संस्था व वस्त्रोद्योग नागपूर, जिल्हा निबंधक सहकारी संस्था, सूतगिरणीचे अध्यक्ष तसेच सुनिता पांडे (विशेष लेखाकार सहकारी संस्था, सुतगिरणी) अमरावती यांचा समावेश आहे. या जनहित याचिकेवर १० सप्टेंबररोजी सुनावणी झाली. त्यात सूतगिरणीला कोणत्याही प्रकारचे अनुदान न देण्याचे राज्य सरकारला स्पष्ट निर्देश दिले असून सर्व प्रतिवादींना नोटीस सुद्धा बजावण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. मुकेश समर्थ व पवन राहूलकर यांनी बाजू मांडली. या जनहित याचिकेची सुनावणी २९ आॅक्टोबर रोजी होणार आहे. याच दिवशी माजी संचालक भोजराज शेलकर यांनी दाखल केलेल्या रिट पिटीशन नं. ११६६ वर सुद्धा सुनावणी होईल.
न्याय मिळेपर्यंत लढा सुरुच ठेवणारसूतगिरणी बंद पडल्याने हजारो कामगारांसमोर बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकरी, शेअरधारकांना न्याय मिळवून देईपर्यंत आप संघटना स्वस्थ बसणार नाही. आमचा लढा सुरुच ठेवू. डॉ. नितीन नांदुरकर, जिल्हा संयोजक, आम आदमी पार्टी, बुलडाणा.