डाेणगाव : शासनाच्या आदेशानुसार परिसरातील ५ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र, बससेवा अजूनही सुरू झालेली नसल्याने विद्यार्थ्यांची तीन किमी पायपीट हाेत आहे. सकाळी आणि दुपारी कणका ते विश्वी अशी पायपीट सुरू आहे.
काेराेनामुळे मार्च महिन्यांपासून शाळा, महाविद्यालये बंद हाेती. तसेच बससेवाही बंद करण्यात आली हाेती. सध्या अनलाॅक प्रक्रियेंतर्गंत बससेवा सुरू करण्यात आली आहे. तसेच सुरूवातीला ९ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या हाेत्या. त्यानंतर २७ जानेवारीपासून वर्ग पाच ते आठ पर्यंत शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. शाळा सुरू हाेऊन आठ दिवस लाेटले असले तरी अद्यापही ग्रामीण भागात बससेवा सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे, विद्यार्थ्यांची पायपीट हाेत आहे. विश्वी येथे विठ्ठल रुख्माई विद्यालयात कनका व परिसरातील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. तसेच ११ वी व १२वीचे विद्यार्थी डाेणगाव येथे शिक्षणासाठी येतात. मार्च महिन्यापूर्वी या परिसरात दाेन बस फेऱ्या सुरू हाेत्या. डाेणगाव येथून सकाळी ६ वाजता विश्वीसाठी बस हाेती.तसेच एक सायंकाळी बस फेरी सुरू हाेती. त्यामुळे, परिसरातील विद्यार्थ्यांना शाळेत जाणे साेयीचे हाेेते. सध्या शाळा सुरू झाल्या असल्या तरी बस फेरी सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे, दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना विश्वी ते कनका असा तीन किमीचा प्रवास पायी करावा लागत आहे. सध्या तापमानात वाढ हाेत आहे. दुपारी २ वाजता भर उन्हात पायी प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे बस फेरी सुरू करण्याची मागणी राहुल राठोड, राणी राठोड, शीतल राठोड , पूजा राठोड, निकिता चव्हाण, कल्पना धोत्रे, आरती ढोकळ , प्रतीक्षा चव्हाण, खराटे आदींनी केली आहे.
बस नसल्याने शाळेत जाणे केले बंद
डाेणगाव ते शेलगाव देशमुख ही सकाळी ६ वाजता जाणारी बस बंद आहे. आठ किमी मार्गावर प्रवाशी ऑटाेही कमी असल्याने अनेक विद्यार्थी शाळेत जातच नसल्याचे चित्र आहे. एसटी महामंडळाने या परिसरात बस फेरी सुरू करण्याची मागणी हाेत आहे.