बीजोत्पादनाच्या अर्जासाठी ५ मेची मुदत
बुलडाणा: खरीप हंगामातील बियाण्यांची जुळवाजुळव आता सुरू झाली आहे. महाबीज मंडळाकडून बीजोत्पादनाचे आरक्षण सुरू आहे. ५ मेपर्यंत शेतकऱ्यांना मागणी अर्ज सादर करता येणार आहेत. बीजोत्पादकांनी संबंधित नोंदणी कार्यालयावर एकाच वेळी गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापकांकडून करण्यात आले आहे.
२५ मे. टन ऑक्सिजन साठा
बुलडाणा: जिल्ह्यात ऑक्सिजन पुरवठा सुरळीत रहावा, यासाठी आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. सध्या जिल्ह्यात साधारणत: २५ मेट्रिक टन ऑक्सिजन साठा आहे. गंभीर रुग्णांना गरजेनुसार ऑक्सिजन पुरविल्या जात आहे.
उन्हाळी पिकाला २४ तास विजेची गरज
नायगाव दत्तापूर : नायगावसह सावत्रा, भालेगाव, शेंदला, मोहणा, पाचला, साब्रा, कंबरखेड येथील शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकांची लागवड केली आहे. त्यासाठी २४ तास वीज उपलब्ध करण्याची गरज आहे. महावितरण विभागाने याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
मोताळा परिसरात अवैध वृक्षतोड
मोताळा: परिसरात मोकळ्या जागेत लाकूड माफियांनी अवैध वृक्षतोड केलेली लाकडे टाकलेली दिसून येतात. महसूल, वन विभागाच्या डोळ्यात धूळ फेकून रात्री विना क्रमांकाच्या ट्रॅक्टर, ट्रकमधून लाकडांची वाहतूक केली जाते.
पोटाला 'लॉक' कसे लावणार?
देऊळगाव मही: लॉकडाऊनमुळे उद्योग, दुकाने बंद असल्याने पतसंस्थांच्या अल्पबचत ठेव खात्यात येणारी आवक थांबली आहे. त्यामुळे अल्पबचत प्रतिनिधींवर उपासमारीची पाळी आली आहे. काम बंद असल्यामुळे पैसा येणे थांबले असले तरी पोटाला लॉक कसे लावणार, असा सवाल त्यांच्याकडून उपस्थित होत आहे.
प्रकल्पाच्या गेटमधून होणारी गळती थांबवा!
बुलडाणा : लघू पाटबंधारे प्रकल्पाच्या एचआर गेटमधून होणारी गळती बंद करण्यात यावी, अशी मागणी वारंवार करण्यात येत आहे. काही प्रकल्पावर कालव्याद्वारे सिंचन करण्यासाठी गेटमधून पाणी सोडण्यासाठी आदेशित केले होते. रब्बी हंगाम संपला असून, गेट बंद केल्यानंतरही गळती थांबली नसल्याचे चित्र आहे.
इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची मागणी घटली
मेहकर: लॉकडाऊनमध्ये प्रत्येक जण पैसे काटकसरीने खर्च करीत आहे. उन्हाळा असूनसुद्धा दुकाने बंद असल्यामुळे फॅन, कूलर आणि एसीची खरेदी बंद झाली आहे. याशिवाय टीव्ही, फ्रीज, मिक्सर, ओव्हन आदी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची मागणीसुद्धा घटली आहे.
कडधान्याच्या मागणीत वाढ
अमडापूर: लॉकडाऊनमध्ये सोशल डिस्टसिंगचे काटेकोर पालन होत नसल्यामुळे आठवडी बाजार बंद आहेत. त्यामुळे पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. याचा परिणाम गृहिणींच्या आर्थिक बजेटमध्ये वाढ झाल्याने या काळात घरीच तयार केलेल्या डाळींचा वापर वाढला आहे. बाजाराचा खर्चही मंदावला आहे.
फोटोग्राफी व्यवसाय अडचणीत
लोणार: सध्या फोटोग्राफी व्यवसायावर अवकळा आली आहे. एका लग्न सोहळ्यासाठी किमान ५ जणांची टीम याकामी लागते; परंतु कोरोना विषाणू संसर्गामुळे मर्यादीत स्वरूपात विवाह पार पडत असल्याने फोटोग्राफी व्यवसाय अडचणीत सापडला आहे.
उकाडा वाढला
साखरखेर्डा: वातावरणातील उकाडा वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. एप्रिल महिन्यातच अशी परिस्थिती आहे. अजून मे महिना पूर्ण कडक उन राहणार आहे. त्यामुळे शेतातील कामेही शेतकरी सकाळी ११ वाजताच्या आतच करत आहेत.
लोणार येथे ८० पॉझिटिव्ह
लोणार: तालुक्यात ८० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यांना उपचारासाठी कोविड सेंटरमध्ये भरती करण्यात आले आहे. येथील कोविड सेंटरमधील बेड अपुरे पडत आहेत. अनेक रुग्ण मेहकर येथील खासगी रुग्णालयातही उपचार घेत आहेत.
कृषीपंपाचे सरसकट वीज बिल माफ करा
बुलडाणा : ‘लॉकडाऊन’मुळे शेतकरी व सामान्य नागरिक आर्थिकदृष्ट्या प्रचंड अडचणीत आले आहेत. याची दखल घेऊन शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे वीज बिल सरसकट तर सामान्य ग्राहकांचे तीन महिन्यांचे वीज बिल माफ करावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. जिल्ह्यात सध्या ‘लॉकडाऊन’ घोषित झाले आहे. हातावर पोट असलेल्या शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.