- अनिल गवई
खामगाव : शासनाने स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत संपूर्ण राज्यात प्लास्टिक बंदी केली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी नगर परिषद प्रशासन सरसावले असून यासाठी शहरात एक गुप्त पथक तायर करण्यात आल्याचे समजते. प्लास्टिक बंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नियोजन सुरू असतानाच, मुख्याधिकाºयांनी स्वत: पुढाकार घेत एका गुप्त पथकही गठीत केले आहे. या पथकावरही मुख्याधिकाºयांची करडी नजर राहणार आहे.
प्लास्टिक पिशव्यांमुळे शहर स्वच्छतेची मोठी समस्या निर्माण झाली आहे. मानव व पर्यावरणास प्लास्टिक अतिशय घातक ठरत आहे. जागतिक स्तरावर प्लास्टिक विरोधात आवाज उठविला जात आहे. कधीच विघटीत न होणाºया प्लास्टिकमुळे पर्यावरणाची मोठी हानी झाली आहे. नगर परिषद क्षेत्रात प्लास्टिकचा वारेमाप वापर होत असल्याने गटारी तुंबण्याचे प्रमाण वाढले आहे. हे प्लास्टिक जनावरांच्या खाण्यात गेल्यामुळे त्यांनाही असाध्य आजार जडत आहे. २० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या सर्रास वापरल्या जातात. पर्यावरणप्रेमी व सामाजिक संघटनांनी सातत्याने प्लास्टिकपासून उद्भवणारे आजार आणि पर्यावरणाची होणारी हानी याबाबत जाणीवजागृती सुरु आहे. मात्र, त्यानंतरही दैनंदिन वापरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा समावेश आहे. आता यावर दंडात्मक कारवाई करुन निर्बंध घालण्याचे कठोर पाऊल शासनस्तरावरुन उचलण्यात आले आहे. याला स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत समाविष्ट केले आहे. प्लास्टिक निर्मूलनाची जबाबदारीही नगर परिषदांवर आली आहे. पालिका प्रशासनाने या मोहिमेला प्रभावी करण्यासाठी ठोस उपाययोजना हाती घेतल्या आहे.
नागरिकांकडून प्रतिसादाची अपेक्षा!
खामगाव पालिकेने शहर स्वच्छतेसोबतच प्लास्टिकपासून परावृत्त करण्याची मोहिम आता शहरात राबविली जाणार आहे. अर्थात या मोहिमेला नागरिकांनी स्वत:हून प्रतिसाद दिल्यास ही मोहिम यशस्वी करता येईल. कारवाईचा धाक हा एका मर्यादेपर्यंत ठिक आहे. मात्र वैयक्तिक प्रत्येकाने प्लास्टिक बॅग वापरणार किंवा वस्तू खरेदी करणार नाही असा संकल्प केल्यास या निर्णयाचे खºया अर्थाने फलित होणार आहे. मानवी आरोग्याच्या दृष्टीने प्रत्येकाने टाळावे हा उद्देश ठेवून नगरपरिषद आरोग्य विभाग कामाला लागला आहे.
प्लास्टिक बंदी पथकावरही लक्ष्य!
खामगाव प्लास्टिक बंदीच्या कडक अंमलबजावणीसाठी एक पथक गठीत केले होते. या पथकाकडून काही प्लास्टिक विक्रेत्यांवर कारवाई देखील करण्यात आली. दरम्यान, कारवाईपूर्वीच ‘कारवाई संदर्भातील माहिती’ संबंधितांपर्यंत पोहोचत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मुख्याधिकाºयांनी एक गुप्त पथक तयार केल्याची माहिती आहे. गुप्त पथक शहरातील विविध ठिकाणी भेटी देवून त्या ठिकाणी प्लास्टिकचा वापर करताना कुणी आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. या पथकात नगरपरिषदेतील आरोग्य निरीक्षक यासह विविध अधिकारी, कर्मचारी राहणार आहे. तसेच या गुप्त पथकावर मुख्याधिकाºयांची करडी नजर राहणार आहे.
प्लास्टिकच्या वापरामुळे होणारे दुष्परिणाम नागरिकांना समजावून सांगितले जाणार आहे. व्यावसायिक आणि किरकोळ विक्रेत्यांनाही प्लास्टिक वापराबाबत यापूर्वीही सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांना घराबाहेर निघताना कापडी पिशवी सोबत घेवून जाण्याबाबत सूचना दिली जाणार आहे. प्लास्टिक बंदीसाठी विविध पथकही गठीत केली आहेत. शासनाच्या निर्देशानुसार खामगावात प्लास्टिकबंदीची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे.
- धनंजय बोरीकर, मुख्याधिकारी, नगर परिषद खामगाव.