धामणगाव बढे : विदर्भ, खान्देश तथा मराठवाड्याला जोडणाऱ्या वाघजाळ फाटा ते धामणगाव बढे रस्त्याची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भ्रष्टाचारामुळे अत्यंत दुर्दशा झाली असून, या रस्त्याचा प्रवास वाहन चालकाच्या जिवावर बेतत आहे. रस्त्यातील खड्ड्यांमुळे नियमित अनेक अपघात घडत आहेत़
वाघजाळ फाटा ते धामणगाव बढे १९ किलोमीटरचे अंतर असून, मार्च २०२० ते मार्च २०२१ पर्यंत किमान तीन वेळा या रस्त्याची डागडुजी करण्यात आली. प्रत्येक वेळी अर्धे खड्डे तसेच सोडून अर्ध्या खड्ड्यामध्ये बारीक गिट्टी भरण्यात येते. आठ दिवसांनी तीच रेती रस्त्यावर येते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भ्रष्टाचाराला जनता कंटाळली असून, वारंवार होणारी डागडुजी फक्त अर्थपूर्ण वाटाघाटीसाठी होत असते. संबंधित ठेकेदार डागडुजीचे काम करीत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे त्याकडे लक्ष नसते किंवा जाणून बुजून त्याकडे कानाडोळा केला जातो. मागील एका वर्षात किमान तीन वेळा या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली, पण एकदाही या रस्त्याची दुर्दशा बदलली नाही.
दुचाकी वाहन चालकाचे तर या रस्त्यावर नियमित अपघात होत असतात. मार्च महिन्यात या रस्त्याची मागील एका वर्षात तिसऱ्यांदा दुरुस्ती झाली. यावेळीसुद्धा अर्धे खड्डे, तसेच सोडून देण्यात आले़ सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन वेळा काम न करताच बिल काढावे; परंतु तिसऱ्यांदा प्रामाणिकपणे रस्त्याचे काम करावे, अशी मागणी रस्त्यातील खड्ड्यांना व सततच्या दुरुस्तीला कंटाळलेले वाहन चालक करीत आहे