धाड : बुलडाणा तालुक्यातील ग्रामीण भागातील मुख्य मार्गापासून गावापर्यंत जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. जिल्हा परिषद अंतर्गत धाड भागातील कुंबेफळ ते टाकळीपर्यंतचा आठ किमी तथा सातगाव फाटा ते गावापर्यंतचा दोन किमी जोडरस्त्याची अत्यंत खडतर अवस्था झाली आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदाेलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.
सातगाव, कुंबेफळ, टाकळी या गावातील नागरिकांना दररोज धाड याठिकाणी विविध कामानिमित्त ये - जा करण्यासाठी या रस्त्याने अत्यंत अडचणींना सामोरे जावे लागते. विशेषतः या गावांमधील गर्भवती महिला, रुग्ण तसेच गंभीर रुग्णांना तातडीने पुढील उपचारासाठी रुग्णालयात जाण्यासाठी या रस्त्याने जाताना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. गत अनेक वर्षे या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीकरता जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने आजवर कुठल्याही प्रकारची तरतूद केली नसल्याने या रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी मनसेच्या वतीने निवेदनात करण्यात आली आहे. गजानन टेकाळे, तालुकाध्यक्ष मनसे यांच्या नेतृत्वात हे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले. या निवेदनावर विजय पडोळ, राहुल चौधरी, भागवत सपकाळ यांच्यासह अनेक मनसे कार्यकर्त्यांची स्वाक्षरी आहे.
जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष
अनेक गावांना जोडणारे सार्वजनिक रहदारीचे रस्ते जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येतात. मात्र अनेक वर्षांपासून या ग्रामीण रस्त्यांवर जिल्हा परिषद प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष केल्याने गावांना जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यांचे नव्याने बांधकाम, मजबुतीकरण, खडीकरण, डांबरीकरण तातडीने करण्याची मागणी निवेदनात केली आहे. आठ दिवसात दुरुस्ती न केल्यास आंदाेलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.