लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: शहरातील कोट्यवधी रुपयांच्या प्लॉट खरेदी-विक्री प्रकरणाचा मुख्यसुत्रधार तथा निलंबित तलाठी राजेश चोपडे विरोधात कारवाईसाठी महसूल विभागातून असहकार्य करण्यात आल्याचे समोर येत आहे.तलाठी चोपडे विरोधात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून विलंब करण्यात आल्याची माहिती आहे. पोलिस दप्तरी फरारी असलेला तलाठी चोपडे आजही दूरध्वनीवरून अनेकांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.चोपडे याने त्याच्या कार्यकाळात मुळ हस्तलिखीत ७/१२ मध्ये बनावट नोंदी केल्या. या बनावट नोंदी करून त्या आधारे संगणकीकृत ७/१२ तयार केलेत. दरम्यान, त्याचे कारनामे उघड झाल्यानंतर महसूलच्या काही महत्वपूर्व दस्तवेजाची खाडाखोड आणि पाने फाडल्याची वस्तुस्थिती समोर येत आहे. चोपडेने मर्जीतील काही दलालांना हाताशी धरून फसवणूक झाल्याचे निर्दशनास आल्यानंतर विकाससिंह राजपूत यांनी तक्रार दाखल केली होती.फसवणूक प्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यानंतर आवश्यक पुरावे गोळा करण्यासाठी महसूल विभागाकडे संपर्क साधण्यात आला. मात्र, महसूल विभागाकडून आवश्यक दस्तवेज मिळण्यास विलंब झाला. त्यामुळे पोलिस तक्रार उशीराने दाखल करण्यात आली, असे तपासी अधिकारी रविंद्र लांडे यांनी सांगितले.