शेगाव : दुचाकीने शेगाव वरून खामगाव कडे येणाऱ्या व्यक्तीला अडवून मारहाण करून त्याच्याकडील दुचाकी, मोबाईलसह रोख रक्कम घेऊन चौघांनी पोबारा केला. ही घटना शनिवारी 10 वाजेच्या सुमारास चिंचोली फाट्याजवळ घडली. या घटनेने पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
शेगाव तालुक्यातील तालखेड येथील रहिवासी भारत रामदास नेमाडे हे शनिवारी रात्री 9.30 वाजता शेगाववरून खामगाव कडे एमएच 14- डीवाय 1758 क्रमांकाच्या दुचाकीने येत होते. चिंचोली फाट्याजवळ त्यांना एकाने हात दिला. गाडी थांबवताच दोन तीन लोक आणखी तिथे आले व मारझोड करू लागले. त्यांच्याकडील मोबाईल, रोख साडेसात हजार रुपये हिसकले व गाडी घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. नेमाडे बराच वेळ मदत मागत होते पण त्यांना लवकर मदत मिळू शकली नाही. काही वेळाने त्यांना एकाने मदत केली. तेव्हा त्यांनी घटनेची माहिती शेगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील घटनास्थळी दाखल झाले. ठाणेदार निकुंभ, पोहेका सुरेश हरणे रात्री उशिरापर्यंत लुटारूंचा शोध घेत होते.