लोणार (जि.बुलडाणा) : तालुक्यातील आरडव येथील निवृत्ती हरीभाऊ मोरे यांच्या घराजवळ असलेल्या नळात अज्ञात इसमाने विषारी औषध टाकल्याची घटना २७ आॅगस्ट रोजी उघडकीस आली. लोणार तालुक्यातील आरडव ग्रामपंचायतने अवैध कनेक्शन धारकांचे नळ बंद करण्याची मोहीम सुरु केलेली असल्याने येथे मागील आठ दिवसापासून पाणी पुरवठा बंद होता. सोमवार २७ आॅगस्ट रोजी सकाळी गावात पाणी पुरवठा करण्यात येणार होता. गावातील निवृत्ती हरीभाऊ मोरे यांनी नळाचे बुच काढताच त्यामधून पांढरा फेस व उग्र वास आला. याची माहिती मोरे यांनी सरपंच दारासींग पवार व आसाराम जायभाये यांना दिली. त्यांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी करुन पंचायत समिती अधिकाऱ्यांना याबाबत कळवीले. विशेष म्हणजे या जलवाहिनीवर गावातील ३० नळ कनेक्शन आहेत. निवृत्ती मोरे यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. याबाबतची माहिती तहसिलदार सुरेश कव्हळे यांना मिळताच त्यांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी करीत पंचनामा केला. तसेच पाण्याचे नमुने तपासणी करण्यासाठी घेण्याचे आरोग्य विभागाला निर्देश दिले. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी एस.पी.ठोके, ग्रा.पं.सचिव शिंगणे, आरोग्य सहाय्यक एस.बी.केंद्रे यांच्यासह गावकरी उपस्थीत होते.
नळात टाकले विषारी औषध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 4:56 PM