- योगेश देऊळकार बुलढाणा - शहरातील रस्त्यावर असलेल्या वृक्षांना खिळे ठोकून त्यात बँनर, फलके लावणाऱ्या शहरातील २५ जणांवर शुक्रवारी शहर पोलिस व नगर परिषदेने कारवाई केली. त्यांच्याकडून दंडाची वसुलीही करण्यात आली. विशेष म्हणजे, याबाबत लोकमतने शुक्रवारी वृत्त प्रसिद्ध करताच ही कारवाई झाली आहे.शुक्रवारी सायंकाळी नगरपालिका व पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे मलकापुरातील आठवडी बाजार रोड, निमवाडी चौक, हनुमान चौक, कारंजा चौक, बसस्थानक चौक, पंचमुखी हनुमान चौक या ठिकाणी मोहिम राबवली. यावेळी जाहिरातीचे अवैध फलक, झाडावर लावलेल्या जाहिरातीचे फलक, रहदारीच्या फुटपाथवर असलेले फलक जप्त केले. यावेळी दोन ट्रँक्टरमध्ये साहित्य गोळा करण्यात आले. तसेच संबंधितावर नगरपालिकेने दंडात्मक कारवाई केली.
यावेळी मलकापूर शहर पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी वाहतूक नियंत्रित करून वाहतुकीचे नियमाचे पालन न करणाऱ्या २५ वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली. यावेळी नगरपालिकाचे मुख्याधिकारी डॉ. आशिष बोबडे, योगेश सावळे, वासू नाफडे व नगरपालिका सफाई कर्मचारी तर पोलीस प्रशासनाचे ईश्वर वाघ, आसिफ शेख, संतोष कुमावत , प्रवीण गवई, गोपाळ तारुळकर व वाहतूक पोलीस कर्मचारी गोपाळ जाधव, संजय गायकवाड, गजानन दांडगे, शेख वसीम, कैलास सोनोने सहभागी झाले.कोट..येत्या काळात नवदुर्गा उत्सवात रहदारी वाढणार आहे. त्यामुळे रस्त्यावर परवानगी शिवाय जाहिराती व बॅनर लावू नये, तसेच अतिक्रमण करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई होईल. - डॉ आशिष बोबडे, मुख्याधिकारी, नगरपालिका, मलकापूर