- योगेश फरपट लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी सुरु करण्यात आलेली १०९१ या क्रमाकांची हेल्पलाईन बंद असतानाही जिल्हयात पोलिसाकडूनहेल्पलाईनची जनजागृती केली जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.महिला व बालकांच्या सुरक्षेबाबत शासन संवेदनशील आहे. अलीकडे महिला हिंसाचाराच्या घटना वाढलेल्या दिसून येतात. त्यामुळेच जिल्हयात पोलिसांकडून जनजागृती कार्यक्रम घेण्यात येत आहेत. नांदुरा पोलिसांकडून ७ डिसेंबररोजी ‘महिला सुरक्षीत तर देश सुरक्षीत’ ही कार्यशाळा घेण्यात आली. पोलिस निरिक्षक सारंग नवलकार, पिएसआय सुलभा ढोले यांनी महिला सुरक्षितता या विषयावर मार्गदर्शन केले.नांदुरा शहर व तालुक्यामधील सामाजीक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेक कार्यकर्त्यां व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी १०९१ हा हेल्पलाईन क्रमांक सुद्धा महिलांना देण्यात आला. प्रत्यक्षात मात्र हा हेल्पलाईन क्रमांक फक्त बिएसएनएलच्याच मोबाईलवरून लागतो याची माहितीही पोलिसांना नसावी. म्हणून त्यांनी मार्गदर्शन करतांना उल्लेख टाळला असावा. कर्तव्यात आघाडीवर असल्याचा दावा करणाऱ्या बुलडाणा जिल्हा पोलिसांना १००, १०९१ या हेल्पलाईनबाबत ‘लोकमत’ने जाणिव करून दिली. तरीही हेल्पलाईन सुरु करण्यासाठी कोणतेही प्रयत्न जिल्हा पोलिस प्रशासनाकडून झालेले दिसत नाही. यावरून बुलडाणा पोलिस किती सतर्क आहेत, हे दिसून येते.
सध्या हेल्पलाईन बंद आहे. पण बिएसएनएलच्या अधिकाऱ्यांची भेट घेवून तातडीने हा प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करीत आहोत. तक्रार पेट्या सुद्धा अनेक ठिकाणी लावल्या आहेत. जनजागृती कार्यक्रम सुद्धा घेण्यात आला. त्यात माहिती देण्यात आली आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी आम्ही सर्वतोपरी दक्ष आहोत. उद्या दुपारपर्यंत हेल्पलाईन सुरु होवून जाईल.- सारंग नवलकार,ठाणेदार,पोलिस स्टेशन नांदुरा.
१०९१ हा टोलफ्री क्रमांक पोलिसांनी जनजागृती कार्यक्रमात महिलांना देण्यात आला. हेल्पलाईन बंद असल्याबाबत जेव्हा समजले. तेव्हा ठाणेदार सारंग नवलकार यांना विचारले. त्यांनी आज सुटी असल्याने उद्या, सोमवारी हेल्पलाईन सुरु होवून जाईल असे सांगितले आहे. हेल्पलाईन सुरु करण्यासाठी आम्ही पोलिस प्रशासनाकडे पाठपुरवाा करू.- सुनिताताई देशमुख,जिल्हा उपाध्यक्ष, महिला काँग्रेस कमिटी, बुलडाणा