बुलडाणा शहरात वाहतूक कोंडीची समस्या नवी नाही. वाहतूक कोंडीचा प्रश्न नित्याचाच झाला आहे. वाहतूक सुरळीत राहावी, अपघात टळावेत, यासाठी बुलडाणा शहरातील मुख्य चाैकांसह चिखली रोड, मलकापूर रोडवर सिग्नल बसविण्यात आले आहेत; परंतु हे सिग्नल नेहमी बंदच असतात. त्यामुळे वाहनचालक या सिग्नलकडे बघतसुद्धा नाहीत. सिग्नलच्या ठिकाणी वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याचे चित्र बुलडाण्यात पाहावयास मिळेत. सिग्नल बसविण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर खर्च नेमका केला कशासाठी, हाच प्रश्न उपस्थित होतो. येथे सिग्नल यंत्रणा केवळ शोभेची वस्तू ठरत आहे. अनेक वेळा तहसील चाैकातील सिग्नलजवळच अपघात घडले आहेत. सिग्नलच्या ठिकाणी वाहतूक पोलीसही हजर नसतात. बाहरेगावावरून आलेल्या नवीन वाहन चालकाला बुलडाण्यात सिग्नल आहेत, तेवढा धाक मात्र दिसतो.
२०० रुपयांचा दंड एका दुचाकी चालकाला वाहतूक नियम मोडल्यास केला जातो; परंतु बुलडाण्यात सिग्नलची यंत्रणाच कार्यान्वित नसल्याने सिग्नलवर नियम मोडणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. सिग्नलच्या ठिकाणी वाहतूक पोलीसही हजर नसतात. बुलडाणा शहरात जयस्तंभ चाैक, संगम चाैक, तहसील चाैक, स्टेट बँक परिसर, त्रिशरण चाैक, खामगाव रोड याठिकाणी सिग्नल बसविण्यात आले आहेत. मात्र, हे सर्व सिग्नल बंद राहत आहेत. त्यामुळे बुलडाण्यात कागदपत्र नसणे, वाहन चालविण्याचा परवाना नसणाऱ्यांवरच कारवाई होते.
स्टेट बँक चौकात सिग्नलचे थाटात उद्घाटन झाले. सुरुवातीचे काही दिवस सिग्नल सुरू होते, नंतर पुन्हा बंद पडल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सिग्नल तातडीने सुरू करणे आवश्यक आहे.
-प्रभाकर वाघमारे.
वाहनधारकांना ई-चालानद्वारे केलेला दंड अद्यापर्यंत कळत नाही. त्यामुळे जास्त वेळा ई-चालन झालेले चालकांना माहिती होत नाही. त्याची जागृती वाहन चालकांमध्ये होणे अपेक्षित आहे.
-गजानन सवडतकर
बुलडाण्यात सिग्नल आहेत, हेच काही वाहन चालकांना माहिती नाही. सिग्नल बंद राहत असल्याने त्याकडे चालक बघतही नाहीत. अपघात टाळण्यासाठी सिग्नल यंत्रणा लवकर सुरू करावी.
-ईश्वरसिंग चंदेल.