लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: हरविलेल्या मुलाचा शहर पोलिसांनी रात्रभर सांभाळ केला. दुसºया दिवशी त्याच्या नातेवाईकांचा शोध घेवून त्याला नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.
एक लहान मुलगा ३० डिसेंबर रोजी खामगावात आपल्या वडिलांसोबत आला. वडिलांना दारूचे व्यसन असल्याने, एका दारूच्या दुकानापासून तो वडिलांपासून दुरावला. वडिल दिसून न आल्याने, बारादरीपर्यंत त्याने वडिलांचा शोध घेतला. मात्र, वडिल मिळून आल्याने तो रडत होता. त्यावेळी शहर पोलिस स्टेशनचे योगेश लोखंडे, प्रफुल्ल टेकाडे, सतीश चोपडे, सुनील अहीर, अनिता मावस्कर यांनी या मुलाला ताब्यात घेतले. पीएसआय रविंद्र लांडे, पीएसआय शेख यांच्या सहकार्याने त्याचा रात्रभर सांभाळ करण्यात आला. त्यानंतर त्याच्या नातेवाईकांचा शोध घेऊन पोलिस निरिक्षक संतोष ताले यांच्या उपस्थितीत या मुलाला त्याचे मामा सुधाकर माने (अकोला) आणि मावसा दिनेश थोरात यांच्या स्वाधीन करण्यात आले.
२१ बालकांच्या नातेवाईकांचा शोध!
खामगाव शहर पोलिसांच्यावतीने १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ यांच्या मार्गदर्शनात तसेच शहर पोलिस निरिक्षक संतोष ताले यांच्या नेतृत्वात आॅपरेशन मुस्कानतंर्गत बेवारस तसेच हरविलेल्या २१ बालकांचा शोध घेण्यात आला. त्यांना नातेवाईक तसेच पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.