लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने धडक कारवाई सुरू केली असून २६ जून ते ३० जून या कालावधीत जिल्ह्यात तब्बल ६८ ठिकाणी छापा टाकून कारवाई करण्यात आली. यामध्ये स्थानिक पोलिसांचीही मदत घेण्यात आली.यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेने ९ प्रकरणात ४ लाख ४० हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. उर्वरित ठिकाणी स्थानिक पोलिस ठाण्याच्या स्तरावर कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी यासंदर्भात कारवाईचे निर्देश दिले होते. अत्यावश्यक वस्तुंचा काळाबाजार व साठा करून ठेवणाऱ्याविरोधात त्यानुषंगाने ही धडक मोहिम राबविण्यात आली. जिल्ह्यात घरगुती वापराच्या सिलींडरचा व्यावसायिक तथा वाहनात इंधन म्हणून होणारा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला होता. त्यानुषंगाने ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनिष गावंडे, पोलिस अंमलदार सुनील खरात, पंकजकुमार मेहेर, भारत जंगले, गणेश सोळंके यांच्यासह अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. या कारवाईत एका ॲटोसह मोठ्या प्रमाणात घरगुती वापराचे सिलींडर तथा अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे.
जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2021 11:59 AM