मलकापूर: गौणखनिज वाहतुकीच्या मोबदल्यात हप्ता म्हणून ७ हजाराची लाच घेताना मलकापूरच्या पोलिस निरिक्षकासह, सहा. पोलिस निरिक्षक आणि एका पोलिस कर्मचाऱ्यास अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. ही घटना शनिवारी १०.३० वाजता स्थानिक पोलिस ठाण्यात घडली.
अभिजीत विलास म्हसकर वय २६ रा. वृंदावन नगर मलकापूर असे तक्रारकर्त्याचे नाव आहे. त्याचा गौणखनिज सप्लायचा व्यवसाय आहे. त्याने दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, त्याच्या तीन टिप्परसाठी प्रत्येकी तीन हजार अशी एकुण ९ हजाराची लाच मागण्यात आली. शेवटी तंटा ७ हजारावर तुटला. ठरल्याप्रमाणे अभिजीत म्हसकर, अकोला लाचलुचपत विभागाच्या पथकासह मलकापूर पोलिस ठाण्यात सकाळी १०.३० वाजता पोहोचला त्याने ७ हजार रुपये पो.कॉ. मोहम्मद इस्तीयाज याच्या हातात दिले. त्याने दिलेले पैसे पोलिस निरिक्षक अंबादास हिवाळे यांनी स्वत:च्या खिशात टाकले. तर दोन दिवसांपासून सहाय्यक पोलिस निरिक्षक साहेबराव खांडेकर यांच्या भ्रमणदूरध्वनीवरून तक्रारकर्त्यांशी संवाद साधला असल्याने त्यांनाही आरोपी करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी चौकशी सुरू आहे. पुढील तपास लाचलुचपत विभागाचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांच्यामार्गदर्शनात ला.प्र.वि.चे पोलिस निरिक्षक ईश्वर चव्हाण करीत आहेत.