फरार आरोपी राजू माधवराव मापारी याच्या राहत्या घरात हा जुगार सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्याआधारे या ठिकाणी २४ मे रोजी रात्री छापा टाकण्यात आला असता उपरोक्त आरोपी मिळून आले. त्यांच्याकडून तीन पत्त्यांचे कॅट, नगदी दोन लाख ४५ हजार २२५ रुपये, २ लाख ६९ हजार रुपये किमतीचे २५ मोबाईल, तीन लाख ७० हजार रुपयांच्या सात दुचाकी, २० लाख रुपयांची चारचाकी वाहने असा एकूण २८ लाख ८४ हजार ५७९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी लोणार पोलिसांत २५ मे रोजी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास विविध कलमान्वये आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास लोणारचे पोलीस उपनिरीक्षक भारत बर्डे हे करत आहेत. साथरोख प्रतिबंध कायद्यांतर्गतही या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
--महिनाभरापासून सुरू होता जुगार--
राजू मापारी याच्या निवासस्थानी महिनाभरापासून हा जुगार सुरू असल्याची लोणारमध्ये चर्चा आहे. कारवाईदरम्यान तो फरार झाला असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. तोही राजकीय क्षेत्राशी संबंधित असल्याची माहिती आहे. या व्यतिरिक्त जालना, अहमदनगरसह, खामगाव, चिखली, लोणारसह अन्य शहरांतील व्यक्ती या ठिकाणी जुगार खेळण्यास येत होते.