खामगाव: लॉकडाऊन काळात दारू विक्री बंद असल्याची संधी साधत गावठी दारूची विक्री वाढविण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या अवैध धंद्याना शहर पोलिसांनी सोमवारी सुरूंग लावला. गावठी दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणाºया दोन मोहफुलांच्या गोदामावर पोलिसांनी सिनेस्टाईल छापा टाकला. या कारवाईत १६ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पाच जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शहर पोलिसांनी टिळक पुतळ्यामागील परिसरातील गोदामावर धडक दिली. त्यावेळी दोन ठिकाणी मोहफुले, दारू विक्रीसाठी लागणारे २७३ नग टिनाचे डबे आणि इतर साहित्याची विक्री होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. संचारबंदीचे उल्लघंन तसेच मास्क आणि इतर साहित्याचा वापर न करताच गुप्ता यांच्या गोदामावर मोहफुलांची गर्दीकरून विक्री सुरू होती. पोलिस आल्याचे समजताच काहींनी घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान, या कारवाईत ६४० पोते मोहफुले किंमत १५ लाख ३६ हजार रुपये , २ मोटार सायकली, २७३ नग टिनडबे, इलेक्ट्रानिक तराजू असा एकुण १६ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गोदामाला सील ठोकले. याप्रकरणी ब्रिजमोहन होशीयारमल गुप्ता, बिपीन सुमेरचंद गुप्ता दोघेही रा.खामगाव, विकास सूर्यभान इंगळे रा. धामनगाव देशमुख ता. मोताळा, सचिन महादेव इंगळे रा. हिंगणा कारेगाव, विजय नागोराव जाधव रा. गारडगाव यांच्या विरोधात महाराष्ट्र दारू बंदी कायदा कलम ६५, ६९ भादंवि कलम १८८, २६९, २७०, २७१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. अप्पर पोलिस अधिक्षक हेमराजसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरिक्षक सुनिल अंबुलकर यांच्या पथकातील पीएसआय सराग, हे.कॉ. वाघमारे, कोळे, गजानन जोशी, पोकॉ. बंटी बडगे, सूरज राठोड, राजपूत, संदीप टाकसाळ, हिवाळे, इंगळे, जाधव यांनी ही कारवाई केली.
गुप्त माहितीच्या आधारे दोन ठिकाणी मोह फुलांची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली. यामाहितीच्या आधारे दोन्ही ठिकाणी छापा टाकण्यात आला. त्यावेळी काही जण पसार झाले. यापैकी ५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.- सुनिल अंबुलकरशहर पोलिस निरिक्षक,खामगाव.