खामगाव: शहरातील अवैध धंद्याविरोधात पोलिसांनी जोरदार मोहिम उघडली असून, गेल्या २४ तासाच्या आंत शहरातील ५ जुगार अड्डे उध्वस्त करण्यात पोलिसांना यश आले. यामध्ये दाळ फैल आणि हरिफैलात करण्यात आलेल्या कारवाईत १४ जणांना अटक करण्यात आली. एसडीपीओ पथक, शिवाजी नगर पोलिस आणि शहर पोलिसांच्या या संयुक्त कारवाईमुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.
शहर पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी शहराच्या विविध भागातील तीन जुगार अड्डे उध्वस्त केले. तर उशीरा रात्री एसडीपीओ आणि शहर पोलिसांच्या संयुक्त पथकाने हरिफैलात केलेल्या कारवाईत ७ जणांवर कलम ४, ५ मुंबई जुगार कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. यामध्ये मो. युसुफ शे. गुलाम, वसीम खान, युसुफखान, रिजवान अ.सत्तार, जुबेरखान अहेमद खान, साजीदखान उस्मानखान, शे.फरीद शे. रहीम, अजीमखान इब्राहिम खान यांचा समावेश आहे. हरिफैलातील शे.फरीद शे. रहीम यांच्या घरात जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांना मिळाली. या माहितीच्या आधारे शहर पोलिसांनी छापा टाकला असता, ७ आरोपी जुगार खेळताना आढळून आले. पोलिस निरिक्षक संतोष ताले, पोलिस उपनिरिक्षक रविंद्र लांडे, सुधाकर थोरात, देवानंद शेळके, रविंद्र कन्नर, गवारगुरू, दीपक राठोड, जितेश हिवाळे यांनी ही कारवाई केली. यात नगदी ८ हजार ३४० रुपये नगदी आणि २२ हजार ३०० रुपये किंमतीचे ६ मोबाईल जप्त करण्यात आले. त्याचप्रमाणे शिवाजी नगर पोलिसांनी दाळ फैलात टाकलेल्या धाडीत सूरज यादव, चंद्रशेखर धात्रक, कपिल तायडे, विशाल सपकाळ, प्रविण इंगळे सर्व रा. दाळफैल, भास्करराव अंभोरे, अमोल मेढे रा. राणागेट यांच्या विरोधात कलम १२ अ मुंबई जुगार कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. या कारवाईत ४ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शिवाजी नगर पोलिस निरिक्षक रविंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनात रविंद्र इंगळे आणि पथकाने केली.
(प्रतिनिधी)