बुलडाणा / देऊळगाव राजा : बुलडाणा पोलीस मुख्यालयात कार्यरत पोलिस शिपायाने गुरुवारी रात्री विष घेऊन आत्महत्या केली. दरम्यान हा प्रकार अनैतिक संबंधातून घडल्याची बाब पोलिस तपासातून समोर येत आहे. यासंदर्भात जाफ्राबाद पोलिस स्टेशनमध्ये आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मूळचे जाफ्राबाद तालुक्यातील गवासणी (जि. जालना) येथील रहिवासी विष्णू गाडेकर (वय ३५) बुलडाणा पोलिस मुख्यालयात शिपाई होते. तर देऊळगाव राजा येथे पत्नी व दोन मुलींसह ते वास्तव्यास होते. जालना येथील महिला पोलिस कर्मचाºयासोबत त्यांचे अनैतिक संबंध होते. सदर महिला त्यांना लग्नासाठी सतत तगादा लावत होती. मात्र गाडेकर यांचे लग्न झालेले असल्याने ते या लग्नाला नकार द्यायचे. त्यामुळे पैसे, सोने, दागिने मागून ती महिला व तिचा साथीदार कर्मचारी त्यांना ब्लॅकमेलिंग करायचे. दरम्यान सततच्या त्रासाला कंटाळून गुरुवारी रात्री १० वाजताच्या सुमारास विष्णू गाडेकर यांनी देऊळगाव राजा येथे विष घेतले. कुटूंबियांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी तत्काळ उपचारार्थ दवाखान्यात हलविले. मात्र त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मृताच्या पत्नीने जाफ्राबाद पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. जालना येथील महिला पोलिस कर्मचारी व तिचा साथीदार प्रशांत उबाळे यांच्या जाचाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे. त्यानुसार जाफ्राबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना अद्याप अटक झाली नसून अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजित मोरे करीत आहेत.
प्रेम त्रिकोणातून घात ?
बुलडाणा पोलिस मुख्यालयातील शिपाई विष्णू गाडेकर व जालना येथील पोलिस कर्मचाºयाचे नेमके कधी सूत कधी जुळले याबाबत माहिती मिळू शकली नाही. मात्र एकाच खात्यात असल्याने ड्यूटीनिमित्त कुठेतरी संबंध आला असेल. त्यातून मैत्री व पुढे प्रेमसंबंध निर्माण झाले असतील असा अदांज सूत्रांनी व्यक्त केला. तर त्या महिला पोलिसाचे हसनाबाद पोलिस स्टेशनमधील प्रशांत उबाळे याच्यासोबतही प्रेमसंबंध असल्याचा आरोप मृताच्या कुटूंबियांनी केला आहे. त्यामुळे प्रेमाच्या त्रिकोणातून घात झाल्याचे बोलले जात आहे.
पोलिस शिपाई आत्महत्याप्रकरणी त्यांच्या पत्नीच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरु असून लवकरच सत्य समोर येईल.
- अभिजित मोरे सहाय्यक पोलिस निरीक्षक पोलिस स्टेशन, जाफ्राबाद