लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: तालुक्यातील लाखनवाडा येथे दारूबंदीसाठी गेलेल्या पोलीसांना जमावाकडून लोटपाट करून धक्काबुक्की केली. तसेच आरडोओरड करून शासकीय कामात अडथळा आणण्यात आला. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये दाखल तक्रारीवरून पोलिसांनी १४ जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
लाखनवाडा मुख्य चौरस्त्यावरील सार्वजनिक ठिकाणी दारूबंदी कारवाईसाठी हिवरखेड पोलीस स्टेशनचे पोलीस नायक सुरेश बाबु राठोड आपल्या सहकाऱ्यांसोबत गेले होते. त्यावेळी कारवाईस अडथळा म्हणून गावातील काहींनी गैरकायद्याची मंडळी जमवून पो.ना सुरेश राठोड यांच्यासह त्यांच्या सहकाºयांना लोटपाट केली, अशी तक्रार राठोड यांनी मंगळवारी सकाळी हिवरखेड पोलीस स्टेशनला दिली. या तक्रारीवरून नवनित सोनाळकर, साधु मार्कड, ज्ञानेश्वर सोनाळकर, आकाश वानखडे, एकनाथ पांढरे, संजय पांढरे, कृष्णा हटकर, कैलास बनसोड व इतर अनोळखी ५ ते ६ लोकांनी संगनमत करून फियार्दी व सहकारी पोलिस कर्मचाऱ्यांना लोटपाट करून धक्काबुक्की केली. याप्रकरणी तक्रारीवरून हिवरखेड पोलिसांनी उपरोक्त आरोपीविरुध्द भादंवि कलम ३५३, ३३२, १८६. १०९, १४३, १४७, १४९,५०६, सहकलम मदाका ६५ (ड) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पीएसआय वसंत पवार करीत आहेत.