- काशिनाथ मेहेत्रे/किशोर मापारी सिंदखेड राजा/लोणार: सहा एप्रिल रोजी मदुत संपणार्या सिंदखेड राजा आणि लोणार पालिका निवडणुकीचे पडघम वाजण्यास प्रारंभ झाला असून २४ मार्च रोजी या दोन्ही पालिकांसाठी मतदान होणार आहे. त्या पृष्ठभूमीवर राजकीय हालचालींनीही वेग घेतला असून दोन्ही पालिकांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणार असल्याचे संकेत असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील बड्या नेत्याने त्याबाबत सुचीत केले आहे.प्रत्येकी १७ सदस्य आणि नगराध्यक्षपदासाठी ही निवडणूक होत आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ही निवडणूक होत असल्याने संपूर्ण जिल्ह्याच्या या निवडणुकीकडे लक्ष लागून राहलेले आहे. राजकीय पक्षही येथे त्यानुषंगाने चांगलाच जोर लावत आहे. दोन्ही पालिकांची निवडणूक जाहीर झाल्याने २१ फेब्रुवारीपासून पालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे राजकीय मोर्चे बांधणीने वेग घेतला आहे. सोबतच चौकाचौकामध्येही निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा रंगू लागल्या आहे.सिंदखेड राजा पालिकेमध्ये १६ सदस्य व नगराध्यक्ष पदासाठी ही निवडणूक होत आहे. गेल्या निवडणुकीत सिंदखेड राजात मतदारांनी शिवसेनेला झुकते माप दिले होते. १७ पैकी शिवसेनेचे नऊ सदस्य निवडून आले होते तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सात व काँग्रेसचा एक या प्रमाणे सदस्य निवडून आले होते. पहिल्या वेळी नंदाताई मेहेञे पावणे दोन वर्षासाठी नगराध्यक्षा राहिल्या होत्या. त्यानंतर गंगाताई तायडे यांचा नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ फक्त दहा महिन्याचा राहिला होता. त्यानंतर मात्र अडीच वर्ष पूर्ण होताच शिवसेनेचे चार सदस्य फुटले व त्यांनी राष्ट्रवादी पक्षाला पांठींबा देऊन अॅड. नाझेर काझी यांना नगराध्यक्षपदी विराजमान केले होते. दरम्यान, आता २४ मार्च रोजी होणार्या निवडणुकीत कोण नगराध्यक्ष बनतो व राजकीय समिकरणे कशी आकारास येतात, याबाबत उत्सूकता आहे.
स्वबळाच्या भाषेमुळे लोणारात चुरसलोणार: पालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच लोणारमध्ये स्थानिक पक्ष प्रमुखांनी स्वबळाचा नारा दिल्याने राजकीय वातावरण तापून ही निवडणूक चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. येथे सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टीकोणातून काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रे व भाज या प्रमुख पक्षांसह भारिप बहुजन महासंघ, राष्ट्रीय समाज पक्षही कामाला लागले आहेत. थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्यात येणार असल्याने या निवडणुकीबाबत सध्या उत्सूकता निर्माण झाली आहे. नगराध्यक्षपद हे अनुसूचित जाती साठी (महीला) राखीव आहे. सध्या तरी कुणाची युती झाली नसल्याने प्रमुख पक्ष स्वबळावर लढण्याच्या तयारीने मैदानात उतरले असल्याचे संकेत आहेत. उमेदवारही या ना त्या पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी धडपडताना दिसत आहेत. काँग्रेसची येथील सुत्रे तालुकाध्यक्ष राजेश मापारी, नगराध्यक्ष भूषण मापारी व शहराध्यक्ष नितिन शिंदे यांच्याकडे असून येथील १७ जागा लढविण्याबाबत त्यांच्यामध्ये एकमत झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेसचा येथील जनाधार वाढलेला असतानाच उमेदवारी मागणार्यांच्या संख्येतही वाढ झालेली आहे. स्वबळावर येथील निवडणूक लढविण्याबाबत भाजप पूर्ण तयारीत असल्याचे सांगितल्या जात आहे. नगराध्यक्षपदाचे भाजपकडे येथे तीन उमेदवार असून नगरसेवक पदासाठी पक्षाकडे जवळपास २१ जणांनी अर्ज केले असल्याचे भाजप तालुकाध्यक्ष अॅड. शिवाजी सानप यांनी सांगितले. ही निवडणूक भाजपसाठीही महत्त्वाची ठरणार असून भाजप जिल्हाध्यक्षांसाठीही ती प्रतिष्ठेची ठरणार आहे. शिवसेनेतर्फे अद्याप अपेक्षीत हालचाली येथे झालेल्या नसल्या तरी परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून असल्याचे शिवसेना शहर प्रमुख पांडुरंग सरकटे यांनी सांगितले. खा. प्रतापराव जाधव, आ. डॉ. संजय रायमुलर आता कोणती व्युव्हरचना आखतात याकडे सध्या लक्ष लागून आहे. पंचायत समिती, बाजार समितीमधील सत्ता समिकरणे सर्वश्रृत आहेत. आघाडी बाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतली, असे राष्ट्रवादी शहराध्यक्ष तौफिक अली यांनी स्पष्ट केले आहे. भारिप बहुजन महासंघ व एमआयएम हे वंचित बहुजन आघाडीही पालिका निवडणूक लढविणार असल्याचे भारिप बहुजन महासंघाचे तालुकाध्यक्ष संघपाल पनाड यांनी स्पष्ट केले आहे.