लोणार : राजकारणात तरुणांचा सहभाग वाढून तरुणांच्या नेतृत्वात पक्ष संघटन वाढविण्याच्या दृष्टिकोनातून तरुणाईचा पॅटर्न वापरणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अनेक प्रस्थापितांचा अपेक्षाभंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तालुक्यातील ६० ग्रामपंचायतमध्ये पक्षापेक्षा सुशिक्षित तरुण व प्रस्तापितांमध्ये खऱ्या अर्थाने गावातील राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून, मोर्चेबांधणीस आलेला वेग पाहता बहुतांश गावांत चुरशीच्या लढतीचे संकेत आहेत.
थेट जनतेतून सरपंच निवडीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सुशिक्षित तरुणांना राजकारणात दमदार ‘एण्ट्री’ मारण्याची व गावाचे नेतृत्व करण्याची एक नामी संधी हुकली असली तरी तालुक्यात होऊ घातलेल्या ६० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी तरुण वर्ग सरसावला आहे. नवनव्या आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता जुन्या नेतृत्वापेक्षा तरुणांमध्येच अधिक असून, विकासात्मक कामे करण्याची विचारक्षमता व इच्छाशक्ती असल्याचे ग्रामस्थांमध्ये चर्चा होत आहे. त्यामुळे गावपातळीवर तरुणांच्या नेतृत्वास जनाधारदेखील मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तरुण नेतृत्वाच्या धसक्याने अनेक गावात राजकीय समीकरणांच्या जुळवाजुळवीला सुरुवात झाली आहे. सुशिक्षित तरुणांमध्ये राजकारणातील भ्रष्टाचाराबाबत तिरस्कार असून, ग्रामविकासाबाबत ते सजग आहेत. गावाच्या प्रत्येक निर्णयात सहभाग घेणारा तरुण वर्ग ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात प्रत्यक्ष उतरण्यासाठी सज्ज झाला असल्याने तालुक्यातील प्रमुख पक्ष काय निर्णय घेतील, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. नवतरुणांना संपूर्ण गावच्या मतदारांपर्यंत पोहोचावे लागणार असल्याने निवडणुकीसाठी मोठा खर्च करावा लागणार असल्याचे चित्र आहे . त्यादृष्टीने सुशिक्षित असण्याबरोबर सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मातब्बर उमेदवारांचा शोध घेणे सुरू झालेले आहे.
राजकीय पक्षांनी पक्ष संघटन वाढवण्यासाठी युवकांवरच लक्ष केंद्रित केल्याचे चित्र आहे.