लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: ‘वैशिष्ट्यपूर्ण’ योजनेंतर्गत शासनाकडून दिल्या जाणा-या ५ कोटी रुपयांच्या निधीवरून खामगाव पालिकेत राजकीय घमासान सुरू आहे. पालिकेतील सत्ताधा-यांवर राजकीय कुरघोडीत राष्ट्रवादीचे नगरसेवक भारी ठरल्याची जोरदार चर्चा असतानाच, शहरातील विकास कामांना खीळ घालण्याचा हा प्रकार असल्याची ओरड पालिकेतील सत्ताधा-यांकडून होत आहे.राष्ट्रवादीचे नगरसेवक देवेंद्र देशमुख यांनी वैशिष्ट्यपूर्ण योजनेंर्गत प्रभाग क्रमांक ९ मधील विविध विकास कामांसाठी शासनाकडून पाच कोटी रुपयांचा निधी खेचून आणला. प्रभाग क्रमांक ९ मधील विविध विकास कामे मार्गी लावण्यासंदर्भात तसेच उपरोक्त कामांना महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाचे कक्ष अधिकारी महेंद्र दळवी यांच्या स्वाक्षरीने २ फेब्रुवारी रोजी मान्यता दिली. परिणामी, सत्ताधा-यांनी शहराच्या विविध प्रभागात सुचविलेली प्रस्तावित कामे अडचणीत आली आहेत. राजकीय शह-काटशहाच्या राजकारणामुळे खामगाव पालिकेत ऐन उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच राजकीय घमासान सुरू झाल्याचे दिसून येते.
सत्ताधाऱ्यांचा निषेधावर भर! खामगाव नगरपालिकेतील सत्ताधारी भाजपवर कुरघोडी करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव नगरसेवक देवेंद्र देशमुख यांनी आपल्या प्रभागात ५ कोटींचा निधी खेचून आणला. त्यामुळे सत्ताधा-यांकडून नगरसेवक देशमुख विकासकामात खीळ घालत असल्याची ओरड होत आहे.
शासनाविरोधात सत्ताधारी उच्च न्यायालयात! शहरातील विविध प्रभागात प्रस्तावित केलेली ५ कोटींच्या कामांना कात्री लागली. ही बाब खामगाव पालिकेतील सत्ताधा-यांच्या चांगलीच जिव्हारी लागलीय. त्यामुळे या संपूर्ण प्रकाराविरोधात नगर पालिकेच्या ‘कारभारी दादा’ने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यासाठी दंड थोपटले आहे.
खामगाव पालिकेतील सत्ताधा-यांकडून गत चार वर्षांत विरोधी नगरसेवकांवर सातत्याने अन्याय करण्यात आला. विकास निधीचे वितरण करताना स्वपक्षीय नगरसेवक आणि सत्ताधा-यांच्या प्रभागातील कामे करण्यात आलीत. अन्याय सहन न झाल्यामुळे शासनदरबारी रेटा देत ५ कोटींचा विकासनिधी प्रभागासाठी खेचून आणला.- देवेंद्र देशमुखनगरसेवक, खामगाव.
एका प्रभागासाठी पाच कोटी रुपयांचा निधी खर्च करणे, म्हणजे शहरातील इतर प्रभागांवर अन्याय करण्यासारखे आहे. यामुळे शहर विकासासाठी चुकीचा पायंडा पडण्यास मदत होईल. देवेंद्र देशमुख आणि शासनाचे हे कृत्य निषेधार्ह आहे. - संजय मुन्ना पुरवार उपाध्यक्ष, नगर परिषद, खामगाव.