अनिल गवई। लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : काँग्रेस नगरसेवकांच्या गैरवर्तनाच्या मुद्यावरून तापलेले पालिकेचे राजकारण विकोपाला जाण्याचे संकेत नजीकच्या काळात मिळत आहेत. नगराध्यक्षांच्या नोटीसला विरोधकांनी असंयुक्तिक उत्तर दिल्याचा दावा सत्ताधार्यांनी केला असून, यासंदर्भात पुढील कारवाईसाठी हालचाली चालविल्या आहेत. परिणामी, उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच काँग्रेस नगरसेवकांची ‘होरपळ’ होणार असल्याचे दिसते.पालिकेच्या सभेतील गैरवर्तनासोबतच सभेत नारेबाजी करण्याच्या प्रकारावरून नगराध्यक्षांनी काँग्रेसच्या सर्वच १२ नगरसेवकांना नोटीस बजावली होती. नगराध्यक्षांच्या या नोटीस प्रपंचामुळे पालिकेतील राजकीय वातावरण तापले असतानाच काँग्रेस नगरसेवकांकडून ‘अशी कुठलीही घटना घडली नाही’, असे ‘कायदेशीर’ उत्तर देण्यात आले आहे. काँग्रेस नगरसेवकांच्या या कायदेशीर उत्तरामुळे नगराध्यक्षांनी दिलेल्या नोटीसवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पालिकेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली असून, घटना घडल्याचे कागदोपत्री पुरावे आपल्याकडे आहेत. उपरोक्त बाबींच्या छायाचित्रणासोबतच प्रोसेडिंग बुकमध्ये नोंद असल्याचा सत्ताधार्यांचा दावा आहे. त्यामुळे विरोधकांचे उत्तर असंयुक्तिक आणि तथ्यहीन असल्याचे सत्ताधार्यांचे म्हणणे आहे. एकमेकांना ‘खोटे’ ठरविण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली असून, या राजकीय युद्धात कोण बाजी मारते, याकडे आता जनतेच्या नजरा लागल्या आहेत.
‘ठरावा’च्या हालचाली!काँग्रेस नगरसेवकांच्या सभेतील गैरवर्तणुकीबाबत खामगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष अनिता डवरे यांनी काँग्रेस नगरसेवकांना महाराष्ट्र नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ४२ (१) अन्वये गैरवर्तणुकीबाबत शासनाकडे शिफारस करण्याचा प्रस्ताव का पाठविण्यात येऊ नये, अशी नोटीस महाराष्ट्र नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ४२ (३) अन्वये नोटीस बजावली होती. या नोटीसचे उत्तर १0 फेब्रुवारीपर्यंत मागितले होते. दरम्यान, काँग्रेस नगरसेवकांनी नगराध्यक्षांना दिलेले उत्तर जिव्हारी लागल्याने सत्ताधार्यांनी काँग्रेस नगरसेवकांच्या अपात्रतेच्या ठरावासाठी हालचाली चालविल्या असल्याचा सूत्रांचा दावा आहे. यासंदर्भात येत्या आठवड्यात पालिकेची विशेष सभाही बोलाविण्यात येणार असल्याचे समजते.
काँग्रेस नगरसेवकांच्या सभेतील गैरवर्तनाचा मुद्दा अतिशय गंभीर आहे. वारंवार सूचना दिल्यानंतरही त्यांच्या वर्तणुकीत काहीच फरक पडला नाही. त्यामुळे काँग्रेस नगरसेवकांना कायदेशीर आणि घटनेला धरुन नोटीस देण्यात आली. बदनामीच्या भीतीने त्यांनी घटना घडली नाही, असे उत्तर दिले आहे. - अनिता डवरे,नगराध्यक्ष, खामगाव
सत्ताधार्यांच्या गैरकारभाराला आळा घालणे, शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून बाधा पोहोचविणार्या विषयांचा विरोध करणे हा विरोधी पक्षाचा अधिकार आहे. पालिकेत बहुमत असल्याने कोणत्याही गोष्टीचे भांडवल करून विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचे सत्ताधार्यांचे प्रयत्न आहेत. खामगाव पालिकेत विरोधकांना बाजू मांडायलादेखील संधी नाही. याबाबत वेळ पडल्यास कायदेशीर लढा दिल्या जाईल.- अर्चना टाले, गटनेत्या, काँग्रेस, न.प. खामगाव.