बुलडाणा : जिल्हा केंद्रीय सहकारी बँक डबघाईस आल्यानंतर या बँकेविरोधात जिल्हाभरात प्रचंड आंदोलन झाले. या बँकेमध्ये झालेली अनियमितता व घोटाळे यांची चौकशी सुरू असून बँकेचे टेस्ट ऑडीट अंतीम टप्प्यात आहे. या टेस्ट ऑडीटचा निर्णय आल्यास टेस्ट ऑडीटमध्ये दोषी आढळणार्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्याच्या राजकारणात मोठा बदल होईल. जिल्हा बँकेच्या टेस्ट ऑडीटचा निर्णय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या जिल्हा बँकेवर जिल्ह्यातील एकदोन अपवाद वगळता सर्वच लोकप्रतिनिधी संचालक मंडळावर आहेत. ही सर्व संचालक मंडळी येणार्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून रिंगणात उभे ठाकणार आहेत. यापैकी एकावर जरी ठपका ठेवण्यात आला तर जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा बदलू शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टेस्ट ऑडीटमध्ये बँकेने आतापर्यंत मंजुर केलेल्या सर्व कर्ज व तारण प्रकरणांचा नव्याने अभ्यास केला जात आहे. यामध्ये बँकेकडे असलेली कागदपत्रे, दिलेले कर्ज, प्रत्यक्षातील वसुली तसेच नियम डावलून दिलेल्या कर्जाचा लाभ या सर्व बाबींची प्रकर्षाने तपासणी केली जात आहे. ज्या संचालकांच्या शिफारशीवरुन असे नियमबाह्य कर्ज वाटप झाले असेल किंवा ही जबाबदारी सामुहिकरित्या निश्चित केली तर पूर्ण संचालक मंडळ जबाबदार धरल्या जावून त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित केली जाऊ शकते. त्या पृष्ठभुमिवर जिल्हा बँकेच्या संदर्भातील निर्णय कधी लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्हा बँकेत सर्व राजकीय मतभेद विसरून राजकीय पदाधिकारी एकत्र आले आहेत. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत जिल्हा बँकेतील अनियमितता हा प्रचाराचा मुद्दा होणार नाही याची दक्षता सारेच पक्ष घेतात. कारण अशा निर्णयाचा फटका कुण्या एका पक्षाला बसणार नसून तो सामुहिकरित्या नुकसानकारक ठरणार आहे.
जिल्हा बँकेचा निर्णय बदलू शकते राजकारण
By admin | Published: September 09, 2014 7:00 PM