मेहकरात गटबाजीच्या राजकारणाची धास्ती! काँग्रेस, राष्ट्रवादीची घालमेल तर शिवसेनेचा ‘कुदळ’ वार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 07:16 PM2019-09-17T19:16:12+5:302019-09-17T19:17:13+5:30

भूमिपूजनांचा धडाका विरोधकांच्या चर्चेचा विषय

politics of mehkar constituency! Congress, NCP confusion and Shiv Sena's spade | मेहकरात गटबाजीच्या राजकारणाची धास्ती! काँग्रेस, राष्ट्रवादीची घालमेल तर शिवसेनेचा ‘कुदळ’ वार

मेहकरात गटबाजीच्या राजकारणाची धास्ती! काँग्रेस, राष्ट्रवादीची घालमेल तर शिवसेनेचा ‘कुदळ’ वार

googlenewsNext

- ब्रम्हानंद जाधव

बुलडाणा: गेल्या २५ वर्षापासून मेहकर विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचे वर्चस्व आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी या पक्षांमध्ये असलेल्या अंतर्गत गटबाजीमुळे हा मतदारसंघात शिवसेनेचाच ‘प्रतापगड’ झाल्याचे दिसून येतो. आता मात्र पक्षांर्तगत वाढलेल्या गटबाजीच्या राजकारणाची इच्छुकांनी धास्ती घेतली आहे. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेचा ‘कुदळ’ वार सुरू असून काँग्रेस राष्ट्रवादीची मात्र घालमेल होत आहे. त्यावरून येथे आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे.

शिवसेनेच्या ताब्यात असलेला मेहकर विधानसभा मतदार संघ १९९४ पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता; परंतू काँग्रेस कार्यकर्त्यांच्या गटबाजीमुळे त्या पक्षाला आपल्या बालेकिल्ल्यावर पकड ठेवता आली नाही. याठिकाणी काँग्रेसमध्ये अनेक दिवसांपासून दोन गट पाहावयास मिळतात. या गटबाजीचा फटका वारंवार काँग्रेस पक्षाला सहन करावा लागत आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांमधील मतभेदाच्या जोरावर शिवसेनेच्या धनुष्य बाणाने १९९४ पासून मेहकर विधानसभा मतदारसंघातील राजकीय समिकरणे बदलवली. विरोधकांचे खाचखळगे ओळखून शिवसेनेचे खा. प्रतापराव जाधव यांनी गेल्या २५ वर्षापासून मेहकर विधानसभा मतदारसंघावर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.

सुरूवातीला स्वत: आमदार आणि नंतर बुलडाणा लोकसभेवर भगवा फडकवण्यात यश आल्याने या मतदार संघात अणखीच त्यांची पाळेमुळे घट्ट झाली. त्यानंतर डॉ. संजय रायमुलकर यांच्यावर मेहकर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी टाकली आणि रायमुलकर हे येथे आमदार आहेत. परंतू शिवसेनेचे डॉ. संजय रायमुलकर हे जरी आमदार असले तरी ‘भाऊ म्हणतील तीच पूर्व दिशा’, अशीच काहीशी परिस्थिती मेहकर विधानसभा मतदारसंघाची आहे. त्यामुळे येथील सर्व नाड्या या खा. प्रतापराव जाधव यांच्याच हातात आहेत.

शिवसेनेच्या या घौडदोडीत मेहकर येथे काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप पक्षामध्ये मात्र गटबाजी वाढतच गेली. आता यंदा शिवसेनेतर्फे विद्यमान आमदार डॉ. रायमुलकर यांच्यासह शिवसेनेकडून येथे यंदा डिगांबर अण्णा डोंगरे यांचेनावही चर्चेत आले आहे. त्यांनी उमेदवारीसाठी मुलाखत दिल्यामुळे राजकीय वर्तूळात यंदा प्रसंगी मेहकरातील उमेदवार बदलतो की काय? अशीही चर्चा आहे. आघाडीत हा मतदार संघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे त्यामुळे राष्ट्रवादीचा उमेदवार कोण यावरही लढतीची तिव्रता ठरणार आहे.

भूमिपूजनांचा धडाका विरोधकांच्या चर्चेचा विषय
विधानसभा निवडणुका जवळ आल्यानंतर मेहकर विधानसभा मतदारसंघात आ. डॉ. संजय रायमूलकर यांनी भूमीपूजनांचा धडाका सुरू केला आहे. गावोगावी समाजमंदिर, सभागृह, डोणगाव येथे शादीखाना या सर्व कामांसाठी निवडणुका जवळ आल्यानेच आमदारांना वेळ मिळाल्याच्या चर्चा विरोधी पक्षाबरोबरच मित्र पक्षातूनही ऐकायला मिळत आहे. निविदा न काढताच कामाचे भूमिपूजन होत असल्याचा आरोपही विरोधकांकडून होत आहे.

मुलाखतींसाठी सर्वात कमी उमेदवार सेनेचे!
भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचीत बहुजन आघाडी या सर्व पक्षांनी विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. परंतू यामध्ये शिवसेना पक्ष वगळता इतर प्रत्येक पक्षातील १० ते १५ उमेदवारांनी मुलाखती दिल्या. परंतू विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या सर्वात कमी केवळ दोनच उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत. त्यामध्ये आ. डॉ. संजय रायमुलकर व डिगांबर आण्णा डोंगरे यांचा समावेश आहे.

 

 

Web Title: politics of mehkar constituency! Congress, NCP confusion and Shiv Sena's spade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.