अर्जुनकुमार आंधळे ल्ल देऊळगावराजा: मानवी जीवनात पाणी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. याच पाण्यावरून जेव्हा राजकारण सुरू होते तेव्हा राजकीय सारीपाटावर मोठी रंगत येते. पाण्यात राजकीय रंग मिसळून श्रेय मिळवण्यासाठीची होणारी धडपड सध्या देऊळगावराजा शहरातील राजकारणाच्या ऐरणीवर आहे. जालना जिल्ह्यातील पीरकल्याण व शिराळा आणि देऊळगावराजा जवळच्या सावखेड भोई या तीन तलावांवरून शहराला पूर्वीपासून पाणीपुरवठा केला जातो. सलग दोन ते तीन वर्षांंंपासून पावसाचे प्रमाण सातत्याने कमी होत गेल्याने उन्हाळ्यात सोडा, ऐन डिसेंबर-जानेवारी महिन्यातच पाणीटंचाईचे भीषण संकट शहरवासीयांच्या नशिबी आले, तर नगरपालिका प्रशासनासमोर प्रचंड आव्हान उभे राहिले. शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटण्यासाठी खडकपूर्णा धरणावरून १३ कि.मी. लांबीची पाइप लाइन मंजूर झाली. तथापि, तत्कालीन कंत्राटदारांच्या असहकार्यामुळे काम रखडत गेले. येणारे पाच महिने पाणीटंचाईमुक्त व्हावे, यासाठी आ.डॉ. शशिकांत खेडेकर, नगराध्यक्ष मालती कायंदे यांनी पाइप लाइनचे काम पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला. आ.डॉ. खेडेकर यांनी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी लावून धरीत शर्थीचे प्रयत्न केले. नगराध्यक्ष मालती कायंदे यांनीही जिल्हाधिकार्यांची भेट घेऊन त्यांच्या पातळीवर हा प्रश्न लावून धरला. त्याचेच फलीत म्हणून खडकपूर्णा धरणावरून येणार्या पाइप लाइनचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या २0 फेब्रुवारीपासून शहराला नियमित पाणीपुरवठा होण्याचे संकेत आ.डॉ. शशिकांत खेडेकर, नगराध्यक्ष कायंदे यांनी शहरवासीयांना दिले आहेत. त्यानुषंगाने शनिवारी पाणीटंचाईसंदर्भात तातडीची सभा पार पडली. त्यामध्ये पाण्याचे टँकर सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. रविवारी सकाळपासून शहराच्या विविध भागात सात टँकर नगरपालिकेने सुरू केले. एकीकडे हे वास्तव असताना पाणीप्रश्नावरून शहराच्या राजकीय सारीपाटावर चांगलेच रंग उधळले गेले आहेत. आमदार शिवसेनेचे, नगरपालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात, राज्यात सत्ताधारी असलेली भारतीय जनता पार्टी मंगळवारी भव्य पाणी मोर्चा काढतेय, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक पाण्यासंदर्भात आमदारांवर आरोप करतात. याच प्रश्नांवर पालकमंत्र्यासोबत एकही बैठक न घेता थेट पाणी मोर्चा, तेही सत्ता हाती असताना, हे एक कोडेच आहे.
दे.राजात पाण्याचे राजकारण पेटले!
By admin | Published: February 08, 2016 2:21 AM