लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : राज्य निवडणूक आयोगाने एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला असून, त्यानुसार बुलडाणा जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. कोरोना संसर्गामुळे जिल्ह्यातील या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊ शकल्या नव्हत्या. मात्र, आता या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.वास्तविक जानेवारी महिन्याच्या अखेरीस या निवडणुका होतील, असा अंदाज प्रशासकीय वर्तुळात व्यक्त केला जात होता. मात्र, निवडणूक आयोगाने ११ डिसेंबर रोजीच राज्यातील मुदत संपलेल्या व नव्याने स्थापित झालेल्या १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केल्याने प्रशासकीय पातळीवरील पूर्वतयारीसही आता वेग आला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील ८७० ग्रामपंचायतींची सात व दहा डिसेंबर रोजी आरक्षण सोडत काढण्यात आली होती, तर एक डिसेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. सात डिसेंबरपर्यंत त्यावर हरकती मागविण्यात आल्या होत्या. ९ डिसेंबरच्या सुधारित कार्यक्रमानुसार अंतिम मतदार यादी आता १४ डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. दरम्यान, निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यापासून निवडणुकांचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे. जिल्ह्यात ५२७ ग्रामपंचायतींची मुदत संपलेली असून, या ग्रामपंचायतींसाठी आता १५ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.
असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम१५ डिसेंबरला निवडणुकीची नोटीस तहसीलदार प्रसिद्ध करणार आहेत. नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास २३ ते ३० डिसेंबर हा कालावधी राहील. ३१ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होईल. चार जानेवारी २०२१ रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असून, याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येऊन उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल. १५ जानेवारी रोजी प्रत्यक्ष मतदान होईल व १८ जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात येईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.