बुलडाणा: १७ व्या लोकसभा निवडणुकीसाठी बुलडाणा लोकसभा मतदार संघात सकाळी सात वाजल्यापासून शांततेत मतदानास प्रारंभ झाला असून जिल्ह्यात अद्यापपर्यंत कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही. दरम्यान, मतदान यंत्रामध्ये निर्माण झालेल्या किरकोळ तांत्रिक अडचणीमुळे तब्बल २६ ठिकाणी बॅलेट युनीट तर २४ ठिकाणी कंट्रेल युनीट बदलावे लागले. ५६ ठिकाणी व्हीव्हीपॅट बदलावे लागण्याची पाळी निवडणूक यंत्रणेवर आली.बुलडाणा जिल्ह्यातील १९७९ मतदान केंद्रावर सकाळी मॉक पोल झाल्यानंतर शांततेत मतदान प्रक्रियेस प्रारंभ झाला. सकाळी सात ते नऊ या कालावधीत ७.८५ टक्के अर्थात आठ टक्के मतदान झाले होते. नऊ वाजेपर्यंत एकूण एक लाख ३८ हजार १५८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. दरम्यान, सकाळी ११ वाजेपर्यंत मतदानाची ही सरासरी टक्केवारी २०.२९ टक्क्यांवर पोहोचली होती. त्यामुळे प्रामुख्याने या टप्पात जवळपास १२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.दुसरीकडे दुपारी एक वाजेदरम्यान मतदानाच्या दिवशी तिसर्या टप्प्यात ३४.४२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला यामध्ये सहा लाख पाच हजार ४९८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये दोन लाख ६८ हजार ९४० महिला आणि तीन लाख ३६ हजार ५५८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. बुलडाणा जिल्ह्यात १७ लाख ५८ हजार ९४३ मतदार आहेत. यामध्ये आठ मतदार हे तृतियपंथीय आहे.बुलडाणा लोकसभेसाठी दुसर्या टप्प्यात मतदान होत असून बुलडाणा लोकसभा मतदार संघात बुलडाणा, चिखली, सिंदखेड राजा, मेहकर, खामगाव आणि जळगाव जामोद विधानसभांचा समावेश आहे.सकाळी मतदान केंद्रांवर तुलनेने कमी रांगा होत्या. ९ ते ११ दरम्यान त्यात वाढ झाली. सोबतच ११ ते एक दरम्यानही मतदान केंद्रावर गर्दी वाढल्याने जिल्ह्याचे सरासरी मतदान हे एक वाजेपर्यंत ३४.४२ टक्क्यांवर पोहोचले होते.
तीन टक्के यंत्रे बदलावली लागलीलोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू करण्यापूर्वीच तीन टक्के व्हीव्हीपॅट यंत्रे मॉकपोल दरम्यान बदलावी लागील आहेत. दरम्यान, १.२१ टक्के कंट्रोल युनीट तर १.३१ टक्के बॅलेट युनीट बदलावे लागले आहे. आकड्या सांगायचे झाल्यास २६ बॅलेट युनीट, २४ कंट्रोल युनीट आणि ५६ व्हीव्हीपॅट मशीन बदलावल्या लागल्या आहेत. जिल्ह्यात ३६९ बॅलेट युनीट, ३६३ कंट्रोल युनीट आणि ४६६ बॅलेट युनीट राखीव ठेवण्यात आलेले असल्याने ही यंत्रे बदलण्यात फारशी अडचण गेली नाही.
अधिकारी नियंत्रण कक्षात ठाण मांडूनलोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात उघडण्यात आलेल्या नियंत्रण कक्षात जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ व संबंधीत वरिष्ठ अधिकारी ठाण मांडून बसले आहेत. अद्यापपर्यंत जिल्ह्यात कोठेही अनुचित प्रकार घडला नसून मतदान प्रक्रिया पारदर्शक व निर्भय वातावरणात सुरू असल्याचे सुत्रांनी सांगितले.