लोणार : १५ जानेवारी रोजी तालुक्यातील १६ ग्रामपंचायतची ५२ मतदान केंद्रावर मतदानप्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडली. ग्रामपंचायत निवडणूक निकाल जाहीर करणेसाठी तहसील कार्यालय लोणार येथे प्रशासन सज्ज झाले आहे. मतमाेजणीसाठी सात टेबल ठवेण्यात आले असून, आठ फेऱ्या हाेणार आहेत. सकाळी ८ वाजता टपाली मतमाेजणीस सुरुवात हाेणार आहे.
लोणार तालुक्यातील कोयाळी, खळेगाव, हिरडव, हिवराखंड, देऊळगाव कुंडपाळ, पांग्रा डोळे, किनगाव जटटू, बिबी, गुंधा, गोत्रा, अंजनी खुर्द, पिंप्री खंदारे, पार्डा प्र., बिबखेड, हत्ता, सोनुना या १६ ग्रामपंचायतींची ५२ मतदान केंद्रांवर १५ जानेवारी रोजी मतदानप्रक्रिया पार पडल्यानंतर उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद झाले होते. दरम्यान, उमेदवार व कार्यकर्त्यांचे जीव टांगणीला लागल्याने अनेकांनी आपला विजय कसा होऊ शकता यात आकडेवारी करत निकालाच्या दिवसाची प्रतीक्षा केली. साेमवारी ग्रामपंचायत मतमोजणी लोणार तहसील कार्यालय येथे सकाळी ९ वाजता सुरू होणार असल्याने उमेदवार आणि कार्यकर्त्यांचे ठोके वाढलेले आहेत. सुरुवातीला टपाली मतमोजणी करण्यात येईल व त्यानंतर ई.व्ही.एम.वरील मतमोजणी करण्यात येणार आहे. एकूण आठ फेरीमध्ये मतमोजणी होणार असून, फेरी निहाय व प्रभागनिहाय मतमोजणी करण्याकरिता सात मतमोजणी पर्यवेक्षक व १४ मतमोजणी सहायक यांची नेमणूक करण्यात आली आहे. शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनही सज्ज झाले आहे.