साखरखेर्डा : गोरेगाव ते उमनगाव रस्त्याची चाळणी झाली असून, मागील वर्षी अतिवृष्टीमुळे वाहून गेलेल्या पुलाचे कामही रखडले आहे. पहिल्याच पावसात पुलाची वाट लागण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाने याची दखल घेऊन काम तत्काळ सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
गोरेगाव ते उमनगाव हा रस्ता दीड किमी अंतराचा असून, या रस्त्याची कित्येक वर्षांपासून दुरुस्ती झालेली नाही. अनेक वेळा ग्रामस्थांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे या रस्त्याच्या मजबुती करणाची मागणी केली आहे. याबाबत संबंधित विभागाला पत्रव्यवहारही केला आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाने हा रस्ता ग्रामसडक योजनेत टाकला असल्याची माहिती ग्रामस्थांना दिली. यावर टेंडरही काढण्यात आले असल्याची माहिती ग्रामस्थांना दिली, परंतु एका वर्षात कोणतेही काम झाले नाही. याच रस्त्यावरील भिकाजी पंचाळ यांच्या शेतातून नाला वाहात येतो. त्या नाल्यावरील पूल मागील वर्षी अतिवृष्टीमुळे वाहून गेला आहे. त्यावेळी उमनगावाचा संपर्क तुटला होता. जिल्हा परिषद बांधकाम विभागाने मुरुम टाकून कसाबसा रहदारीसाठी रस्ता मोकळा केला होता. त्यानंतर, पुराच्या पाण्यात एक बाजू वाहून गेली आणि वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. या वर्षी पूर आला, तर उमनगावाचा संपर्क तुटण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. याची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी त्या रस्त्यासह पुलाचे काम तत्काळ सुरू करावे, अशी मागणी सरपंच प्रकाश भगत, माजी सरपंच शांताराम गवई, माजी सरपंच मोहन गायकी, पंजाबराव मोरे, नामदेव खिल्लारे, गुलाब खिल्लारे यांनी केली आहे.