अझहर अली
संग्रामपूर: कुपोषणावर मात करण्यासाठी ६ महिने ते ३ वर्षे वयोगटातील बालकांना वाटप करण्यात येत असलेला पाकीटबंद पूरक पोषण आहार निकुष्ट दर्जाचा असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या निकृष्ट पाकीट बंद पूरक पोषण आहारामूळे गरोदर स्तनदा मातांसह बालकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.
महिला व बाल विकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालयामार्फत तालुक्यातील गरोदर माता व ६ महिने ते ३ वर्ष वयोगटातील बालकांसाठी पाकीटबंद पूरक पोषण आहाराचे वाटप करण्यात येत आहे. मात्र, या पाकीटबंद धान्याचा पूरवठा निकृष्ट असल्याने शिजवल्यावर रंग काळा पडत आहे. त्यातून दुर्गंधी येत असल्याने गरोदर मातांसह बालकांच्या जीवाशी खेळण्याचा जीवघेणा प्रकार संग्रामपूर तालुक्यात आढळून आला आहे. संग्रामपूर तालूक्यात गरोदर स्तनदा मातांची संख्या १ हजार ८२३ असून ६ महिने ते ३ वर्षों वयोगटातील ५ हजार १६७ बालके आहेत. १७९ अंगणवाड्यांच्या माध्यमातून पाकीट बंद धान्याचे वाटप ५ हजार ३४१ लाभार्थ्यांना करण्यात आले आहे. आहार शिजवल्यावर त्याचा रंग काळा पडत आहे. तसेच त्यातून दुर्गंधी येत असल्याने आहार खाण्यायोग्य नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
निकृष्ट दर्जाचा पूरक आहार खाद्यान्न म्हणून दिला जात असल्यानेच बालकांमधील कूपोषण वाढत असल्याचा गंभीर आरोप गरोदर मातांकडून होत आहे. या गंभीर प्रकाराबाबत संग्रामपूर येथील प्रभारी प्रकल्प अधिकारी यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही.
ग्रामीण भागात अंगणवाड्यांना पूरवठादारांकडून पाकीट बंद पूरक पोषण आहाराचे निकृष्ट धान्याचा पुरवठा करण्यात आला आहे. पाकीट बंद खाद्यान्न शिजवल्यावर त्याचा रंग काळा पडत असून त्यातून प्रचंड दुर्गंधी येत आहे. तो आहार जनावरांच्या देखील खाण्यायोग्य नाही. आहाराद्वारे गरोदर स्तनदा मातांसह बालकांच्या जिवाशी खेळणे तातडीने थांबविण्यात यावे. तसेच निकृष्ट धान्याचा पुरवठा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. अन्यथा मोठे आंदोलन करण्यात येईल. - पंकज मिसाळ, तालूका उपाध्यक्ष, सरपंच संघटना संग्रामपूर