बुलडाणा: शिवसेना वैद्यकीय आघाडीच्या बुलडाणा तालुका अध्यक्षपदी डॉ. अरुण पोफळे यांची नियुक्ती २२ फेब्रुवारी रोजी करण्यात आली आहे. त्यांना खा. प्रतापराव जाधव यांच्याहस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी आ. संजय गायकवाड, जालींधर बुधवत उपस्थित होते.
आरडव येथे पुन्हा पॉझिटिव्ह
लोणार: तालुक्यातील आरडव येथे पुन्हा एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बुधवारी सापडला आहे. शहरापाठोपाठ आता ग्रामीण भागातही कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आठ तास वीज पुरवठ्याची प्रतीक्षा
सुलतानपूर: नवीन कृषी पंप वीज धोरणात शेतकऱ्यांना आठ तास वीज देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे; परंतु अद्याप शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीज पुरवठा देण्याच्या धोरणाची अंमलबजावणी सुरू झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना या नवीन नियमाची प्रतीक्षा आहे.
कोविड तपासणी मोहीम
जानेफळ: देऊळगाव साकरशा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात २३ फेब्रुवारी रोजी कोविड तपासणी मोहीम राबविण्यात आली. यावेळी गावातील व्यापाऱ्यांसह इतर ३५ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. येथे आतापर्यंत एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही.
रासेयोच्यावतीने कार्यक्रम
मेहकर: येथील एम.ई.एस. हायस्कूलमध्ये संत गाडगे बाबा यांना २३ फेब्रुवारी रोजी अभिवादन करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने संत गाडगे बाबा यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे अयोजन करण्यात आले होते. यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
खासगी डॉक्टर लसीपासून वंचित
किनगाव राजा: खासगी डॉक्टर कोविड शिल्ड लसीकरणापासून वंचित आहेत. कोरोनाच्या काळात खासगी डॉक्टरांचाही वैद्यकीय सेवेत मोठा वाटा आहे. त्यामुळे त्यांना लस देणे अत्यावश्यक आहे.
महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ले वाढले
मोताळा: तालुक्यात महावितरण कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. २४ फेब्रुवारी रोजी शहरातील आदर्श नगर वार्डमध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्याला तलवारीचा धाक दाखवून मारहाण केल्याची घटना घडली होती. यापूर्वीही एका कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली होती.
दंड होत नसल्याने बेफिकीरी
धाड: कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे सत्र सर्वत्र सुरू आहे; परंतु धाड परिसरात कारवाई होत नसल्याने नागरिकांची बेफिकीरी वाढली आहे. अनेक जण विनामास्क बाहेर फिरताना दिसतात.