सिंदखेडराजा तालुक्यातील पूर्णा येथील रहिवासी असलेले वैभव घनश्याम कुटे हे जालना येथील एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्रामवर अकाऊंट असून, ते स्वत: सोशल मीडियावर सक्रिय आहेत. १९ जुलै रोजी त्यांना त्यांचे भाऊ धनंजय कुटे व इंस्टाग्रामवरील मित्र यांनी फोनद्वारेर सांगितले की, त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर त्यांचे प्रोफाईलचा फोटो असून, सोबत महिलांचे अश्लील फोटो अपलोड केलेले आहेत. त्यामुळे तक्रारदार यांनी त्यांचे अकाऊंट पाहिले असता त्यांचे इंस्टाग्राम अकाऊंटवरील प्रोफाईल फोटोचा व त्यांचे नावाचा कोणीतरी अज्ञात व्यक्तीने वापर करुन त्यावर महिलांचे अश्लील फोटो टाकून व्हायरल केले. त्यामुळे त्यांची बदनामी झाली. त्यांनी किनगावराजा पोलीस स्टेशनला तक्रार दिली. हा गुन्हा नंतर सायबर पोलीस स्टेशनकडे हस्तांतरित करण्यात आला होता. सायबर पोलिसांनी दाखल गुन्ह्याचे तपासात तक्रारदार यांचे इंस्टाग्राम अकाऊंटचा गैरवापर करणाऱ्याचा तांत्रिक साधनांचे आधारे शोध घेऊन वैभव घनशाम कुटे यांचे इंस्टाग्राम अकाऊंट वैभव बाळासाहेब लोंढे (रा. शेवगल, पो. पानेवाडी, ता. घनसावंगी, जि. जालना) याने तयार केले असल्याचे तपासात आढळून आले. पोलिसांनी आरोपीस औरंगाबाद येथून अटक केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अपर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी तथा पोलीस निरीक्षक अनिल बेहेरानी यांनी गुन्ह्याचा तांत्रिक सखोल तपास करुन आरोपी शोधण्यासाठी सायबर पो.स्टे.चे सहायक पोलीस निरीक्षक सुभाष दुधाळ, पोलीस अंमलदार ज्ञानेश नागरे, पवन मखमले, राजू आडवे, कैलास ठोंबरे, योगेश सरोदे, शोएब अहमद यांचे पोलीस पथक औरंगाबाद येथे पाठवून आरोपीस गुन्ह्यात वापर केलेल्या मोबाइल हॅन्डसेटसह अटक करुन कार्यवाही केलेली आहे.