लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : पर्यावरण, भूजल कायदा, आराेग्य मानकांचे पालन होत नसल्याच्या कारणामुळे आरआे प्लांट (रिव्हर्स आँस्मोसिस) पाणी शुध्दीकरण केंद्र बंद करण्याचा आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिला आहे. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्था तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाकडून ही कारवाई अद्याप सुरू झालेली नाही. लगतच्या काळात आरआे प्लांट बंद पडल्यास नागरिकांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशाने पाणी शुद्धीकरणाच्या आरओ केंद्रांना सील ठोकले जाण्याची शक्यता आहे. शहरासह जिल्ह्यात शेकडो आरआे (रिव्हर्स आसमोसिस) केंद्र आहेत. तेथे पाण्यावर प्रक्रिया कॅन किंवा जारमधून पाणी विकले जाते. पाच रुपयात २० लिटर पाणी देण्याचा हा व्यवसाय कित्येक वर्षांपासून सुरू आहे. जिल्ह्यात पाण्याचे मुबलक स्त्रोत असले तरी जिल्हावासियांना नियमित व शुद्ध पाणी अद्यापही उपलब्ध झाले नाही. त्यातच खारपाणपट्ट्यातील अनेक गावांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे अनेकांना आरओच्या पाण्याची सवय लागली. मात्र दोन दिवसांपूर्वी हरित लवादाच्या निर्देशानंतर आरआे केंद्र बंद केली जाणार आहेत. काही ठिकाणी ही कारवाई सुरू झाली. मात्र, जिल्ह्यात अद्याप सुरूवात झालेली नाही. ती कारवाई केव्हाही सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आरओ केंद्र संचालकांचे धाबे दणाणले आहे.
आरओ बंदची कारणेआरओ केंद्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा केला जातो, मात्र त्यापैकी बहुतांश पाणी हे वेस्टेज असते. ते वाहून जाते परंतु त्याचे पुर्नभरण होत नाही. याशिवाय अन्न व औषध प्रशासनाची परवानगी, टीडीएसची योग्य मात्रा हवी. या बाबी पाळल्या जात नाहीत. n त्यातच आरओच्या पाण्यात टीडीएसची मात्रा किती प्रमाणात असावी, याबाबतही विविध मते व्यक्त केली जात आहेत. गुणवत्तेनुसार पाण्याचे वितरण होत आहे किंवा नाही याची शहानिशा अन्न व औषधी प्रशासनाकडून केली जात नसल्याचा प्रकारही यापूर्वी घडला आहे.