लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्याचा सिंचन अनुशेष भरून काढण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या व २०१७ पासून केंद्र शासनाच्या बळीराजा संजीवनी योजनेतंर्गत समाविष्ट असलेल्या जिगाव प्रकल्पासाठीच्या ४,९०६.५० कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीसंदर्भात १४ सप्टेंर रोजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याशी एका शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा झाली आहे.परिणामी जिगाव प्रकल्प पुर्णत्वास जाण्यासोबतच त्यास अतिरिक्त निधी उपलब्ध होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.जलसंपदामंत्री जयंत पाटील व बुलडाण्याच पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, आ. राजेश एकडे यांनी जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राज्यपालांची भेट घेवून सविस्तर चर्चा केली.जिगावसाठी अनुशेषाच्या राखीव निधी व्यतिरिक्त अतिरिक्त निधीच्या तरतुतीसाठी विशेष बाबा म्हणून विचार व्हावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.दरम्यान, पाच हजार कोटी रुपयांवरील प्रकल्प व जे प्रकल्प पुर्णत्वाकडे पोहोचले आहेत त्यासह पर्यावरण परवानगी किंवा इतर कारणांनी प्रलंबीत आहेत, अशा प्रकल्पांची माहितीही सादर करण्याचे निर्देश यावेळी राज्यपालांनी दिले. तसेच राज्यातील काही प्रकल्पांच्या कामाला गती मिळावी म्हणून ते राष्ट्रीय प्रकल्प घोषित करता येवू शकतात का? याची शक्यताही तपासण्याचे त्यांनी सांगितले.अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या पुढाकारातून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राजभवानावर ही बैठक घेण्यात आली होती. यावेळी जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव लोकेश चंद्र यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. जयंत पाटील, डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी जिगाव प्रकल्पासंदर्भात सविस्तर माहिती राज्यपालांना यावेळी दिली. सोबतच पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी राजमाता माँ जिजाऊंचे तैलचित्रही राज्यपालांना यावेळी भेट दिले.
लवकरच पुन्हा एक बैठकजिगाव प्रकल्पासह राज्यातील मोठ्या प्रकल्पांना गती देण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पुढील आठवड्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. प्रामुख्याने जिगाव प्रकल्प या बैठकीत केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आ. राजेश एकडे यांनी व्यक्त केली.