डोणगाव : डाेणगाव ते मेहकर रस्त्याची गेल्या काही दिवसांपासून दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर माेठमाेठे खड्डे पडल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. हे खड्डे चुकविण्याचा प्रयत्नात अपघातांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी हाेत आहे. डाेणगाव हे राज्य महामार्गावरील गाव असून, येथून दरराेज शेकडाे वाहने ये-जा करतात. मध्यंतरी लाॅकडाऊनच्या अगाेदर सार्वजनिक बांधकाम विभागाने डाेणगाव ते मेहकर राज्य महामार्गावरील खड्डे साधी गिट्टी टाकून बुजविले हाेते. या खड्यातील गिट्टी बाहेर आली आहे. यामुळे खड्ड्यांचा आकार माेठा झाल्याने वाहने चालवताना कसरत करावी लागत आहे. डाेणगाव येथे बसस्थानक परिसर तसेच म. वा. पातुरकर विद्यालयाजवळ राज्य महामार्गावर जीवघेणे माेठाले खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे बसस्थानकाशेजारी खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात एखादा माेठा अपघात हाेऊ शकताे. पातुरकर विद्यालयाजवळ असलेल्या खड्ड्यामुळे अनेक दुचाकीस्वार पडून जखमी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे एखादा माेठा अपघात हाेण्यापूर्वी या रस्त्यावरील जीवघेणे खड्डे बुजवून डांबरीकरण करावे, अशी मागणी वाहनचालकांमधून हाेत आहे.
खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 4:33 AM