सिंदखेडराजा :समृद्धी महामार्गावर पहाटे 1:30 वाजता अचानक मोठा आवाज झाला. पिंपळखुटा येथे घरात झोपलेल्या नागरिकांनी समृद्धी महामार्गाकडे धाव घेतली. तर एक खास दिवस असल्याचे प्रत्यक्षदर्शी दिसून आले. अपघातातील मृत्यूचा थरार अंगावर काटा आणणारा होता. बसमधून मला बाहेर काढा असा आवाज येत होता तर कोणी खिडकीची काच फोडून बाहेर येण्याचा प्रयत्न करत होता. मृत्यूचे तांडव रोखायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाला होता.
समृद्धी महामार्गावरील पिंपळखुटा नजीक अपघात घडताच पिंपळ खुटा येथील रामेश्वर जायभाये, शिवाजी दराडे, विकास घुगे यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. एक खाजगी बस जळत असल्याचे त्यांना दिसून आले, बसमधून वाचविण्यासाठी प्रवाशांचा आवाज येत होता. परंतु बसचे दार पूर्णपणे बंद असल्यामुळे आणि आगीचा भडका वाढत असल्याने बस मधून प्रवाशांना काढणे कठीण होते. दरम्यान, या तिघांनी सुरुवातीला सिंदखेडराजा पोलीस स्टेशनला फोन लावला. त्यानंतर काही वेळातच घटनास्थळावर पोलीस आले. मेहकर, लोणार, सिंदखेड राजा नगरपालिकेच्या अग्निशमन यंत्रणा बोलावण्यात आल्या. काही वेळातच अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी पोहोचली. आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. परंतु तोपर्यंत अनेकांचा आगीने मृत्यू झाला होता.
मृतदेह बाहेर काढणे चालले तीन तास
समृद्धी महामार्गावरील खाजगी बसच्या अपघातानंतर मृतदेह बाहेर काढण्याचे काम जवळपास तीन ते साडेतीन तास चालले. यासाठी अनेकांनी मदत केली. अपघात घडताच सिंदखेड राजा येथील संदीप मेहत्रे, यासीन शेख, बुद्ध चौधरी यांनी मदतीचे मोठे कार्य केले. सकाळी दोन वाजता हे घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू झाले. सकाळी जवळपास पाच वाजेपर्यंत रक्ताच्या थारोळ्यातून मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर 25 मृतदेह एकूण सात रुग्णवाहिकेतून बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना करण्यात आले.