- अनिल गवई
खामगाव : तालुक्यातील बोरजवळा येथील तलावात अर्भक मृतावस्थेत सापडले. या घटनेमुळे गावात विविध शंकांना पेव फुटले. अशातच पोलिस, पोलिस पाटील आणि ग्रामस्थांनी या अर्भकाला पोस्ट मार्टेमसाठी सामान्य रूग्णालयात आणले. रूग्णालय प्रशासनाकडून देखील या अर्भकाचे पोस्टर्माटम सुरू करण्यात आले. त्यावेळी हे अर्भक नसून बाहुले असल्याचे स्पष्ट झाले.
खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील बोरजवळा येथील तलावावर गुरूवारी रात्री अज्ञात अर्भक आढळून आले. मुलीच्या जातीचे अर्भक असल्याने गावात विविध शंकांना पेव फुटले. अनैतिक संबध आणि कुमारी मातेचे हे कृत्य असल्याची चर्चा असतानाच, पिंपळगाव राजाचे ठाणेदार सचिन चव्हाण यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस पाटील आणि गावातील नागरिकांच्या मदतीने सदर अर्भकाला पोस्टमार्टमसाठी खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयात आणण्यात आले. पोलिसांनी दवाखान्यात आणलेल्या अर्भकाचे सामान्य रूग्णालयातील डॉक्टरांनीही पोस्टमार्टम केले. त्यावेळी बाहुल्याच्या आतील स्पंज बाहेर आल्याने हे अर्भक नसून बाळासारखे दिसणारे बाहुले असल्याचे समोर आले. त्यानंतर गावातील व पोलिस हा प्रकार कुणी केला, याचा शोध घेत आहे.
पोलिसांची आकस्मिक मृत्यूची नोंद!गुरूवारी रात्रीच पिंपळगाव राजा पोलिसांनी अर्भकाच्या मृत्यू प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंदही घेतली. रात्री १०:३० वाजतापासून सकाळी ११ :३० वाजेपर्यंत म्हणजे सुमारे २५ तासाचा अवधी अर्भक नसून बाहुली आहे, हे शोधायला लागले.