खामगाव : कोरोना काळात शासकीय अधिकारी-कर्मचाऱ््यांच्या बदली प्रक्रीयेला ३० जूनपर्यंत स्थगिती देण्यात आली होती. ती शुक्रवारी उठवण्यात आली. तसेच १४ आँगस्टपर्यंत बदली प्रक्रीया पूर्ण करावी, त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत बदल्या करता येणार नाही, असे सामान्य प्रशासन विभागाने ९ जुलै रोजीच्या शासन निर्णयात म्हटले आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
राज्यात दरवर्षी अधिकारी-कर्मचाऱ््यांच्या बदल्या एप्रिल व मे महिन्यात केल्या जातात. त्यानुसार १० मे रोजी नियमित बदली प्रक्रीयेला स्थगिती दिल्याचा आदेश सामान्य प्रशासन विभागाने दिला होता. दरम्यान, बदली प्रक्रीयेबाबत मार्गदर्शक सूचना देण्याचेही शासनाने ठरवले होते. त्यानुसार ९ जुलै रोजी या विभागाने बदली प्रक्रीयेच्या धोरणाबाबत आदेश दिला. चालू वर्षात २०२१-२२ मध्ये १५ टक्के बदल्या करण्यास १४ आँगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत बदल्या करता येणार नाहीत, असेही नमूद केले आहे.सोबतच मार्गदर्शक सूचनाही दिल्या आहेत. त्यामध्ये बदली खर्चावर मर्यादा ठेवण्यासाठी १५ टक्केचे बंधन पाळण्याचे म्हटले आहे. सोबतच संबंधित पदावर कालावधी पूर्ण झालेल्या पात्र अधिकारी-कर्मचाऱ््यांची प्राधान्याने बदली केली जाणार आहे. सर्वसाधारण बदल्यांची कारवाई ३१ जुलैपर्यंत केली जाणार आहे. ती प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतरच रिक्त पदांवर बदली प्रक्रीया सुरू होणार आहे. विशेष कारणास्तव बदल्या १ आँगस्ट ते १४ आँगस्ट या कालावधीत होणार आहेत. विशेष बदल्या एकुण कार्यरत पदांच्या १० टक्के एवढ्या कराव्या, असेही निर्देश दिले आहेत.