खामगाव: सध्या वातावरणातील बदलामुळे भाजीपाला पिकावर ‘पावडरी मिल्ड्यू’ भूरी रोगाचा प्रादुर्भााव झाला आहे. या रोगामुळे पानगळ होत असून, लाखो रूपये खर्चून पेरणी केलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. खामगाव तालुक्यात रब्बी हंगामात ३३ हजार ८४८ हक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. कांद्याची ३६८३ तर भाजीपाल्याची ११२६३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. रात्री उच्च सापेक्ष आद्रता व दिवसा कमी सापेक्ष आद्रता तसेच २२ ते ३० डिग्री सेल्सीअस तापमान असे पाेषक वातावरण असल्याने या रोगाचा प्रसार वाढला आहे. यामुळे झाडांची पानगळ होत आहे. झाडांची संपूर्ण पाने गळून पडत असून, झाडे सुकत आहेत. त्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. शेतकरी फवारणी करीत आहेत. मात्र, फवारणी केल्यावरही पानगळ सुरूच आहे. रोगाची लक्षणेया रोगाचा प्रादुर्भाव झाला तर मिरचीच्या पानांच्या वरच्या बाजुस पिवळसर डाग पडतात. रोगाच्या नंतरच्या काळात पानाच्या खालच्या बाजूस पिठासारखी पांढरी बुरशी वाढते व नंतर पृष्ठभागावर पसरल्यामुळे प्रकाश संष्लेशन क्रियेमध्ये अडथळा निर्माण होवून पाने व फुले गळून पडतात. पिकांवर सध्या भूरी रोग आला आहे. या रोगामुळे पानगळ होत आहे. फवारणी केल्यावरही झाडांची पाने गळून पडत आहे. शेंड्यापर्यंत झाडांची पाने गळून पडत असून केवळ खोडच शिल्लक राहत आहे. त्यामुळे झाड सुकत आहे. - दीपक हागे, शेतकरी, वानखेड झाडांचे नियमित निरिक्षण केल्यानंतर रोगाचा प्रादुर्भाव निदर्शनास आल्यावर सल्फर ८० टक्के डब्ल्यू पी २५ ग्रॅम किंवा अझोक्सा ट्रोबिन २३ एस. सी. अधिक १० मिली अॅमीटर, संयुक्त बुरशीनाशके जसे ॲझोक्सास्ट्रोबिन ११ टक्के अधिक टेबूकोनाझोटल १८.३ टक्के एस बी किंवा १० मिली टेब्यूकोनाझोल १८.३ टक्के अधिक सल्फर ६५ टक्के डब्ल्यूजी २५ ग्रॅम याची फवारणी करावी. - अनिल तु. गाभणे, पीक संरक्षण तज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, जळगाव जामोद
भाजीपाला पिकांवर ‘पावडरी मिल्ड्यू’ रोगाचे थैमान; भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात
By विवेक चांदुरकर | Published: February 03, 2024 7:04 PM