- प्रा.नानासाहेब कांडलकर जळगाव जामोद : जळगाव जामोदएसटी बसस्थानकावरील पंखे हे अनेक महिन्यापासून बंद आहेत. ते सुरू करण्यासंदर्भात प्रस्ताव आगार प्रमुखांकडून विभागीय नियंत्रकांकडे आणि तेथून मुंबईच्या एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला. परंतु त्याची दखल या कार्यालयाने न घेतल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ना.दिवाकरराव रावते यांना मिळताच त्यांनी चक्क संबंधित कार्यालयाचीच वीज बंद करण्याचे आदेश दिले. त्यामुळे एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकारी कार्यालयामध्ये एकच खळबळ उडाली आहे. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे घोषवाक्य मिरविणाऱ्या एसटीच्या अधिकाऱ्यांना प्रवाशांची नीट सेवा न केल्यामुळे चक्क घामाने ओले चिंब होऊन दिवसभर काम करण्याची यामुळे वेळ आली. तर या निर्णयाने ना.दिवाकर रावते यांनी लोकाभिमुख शासनाचा प्रत्यय आणून दिला. बसस्थानकावरीले इलेक्ट्रीक पंखे अनेक महिन्यापासून बंद आहेत. याबाबत वारंवार तक्रारी करूनही उपाययोजना झाली नाही. आगार प्रमुख व विभागीय नियंत्रक यांनी नवीन पंखे बसवून देण्यासाठीचा प्रस्ताव दोन महिन्यापुर्वी पाठविला. परंतु संबंधित विभागाने त्याची दखल घेतली नाही. ही बाब जेव्हा ना. रावते यांच्या निदर्शनास आली.तेव्हा त्यांनी या घटनेची दखल घेवून प्रस्तावाला विलंब झाल्याने त्या कार्यालयाची वीज तोडण्याचे आदेश दिले. कार्यालयीन दप्तर दिरंगाईमुळे सर्वसामान्य प्रवाशांना उन्हाचा चटका बसला त्याची शिक्षा म्हणून जोपर्यंत हे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्या कार्यालयातील पंखे व वातानुकुलीत यंत्रणा सुरू होणार नाही याची कल्पना आली. त्यामुळे तातडीने हा प्रस्ताव मंजुर करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे समजते. महामंडळ अध्यक्षांच्या या अकल्पित कृतीमुळे अधिकाºयांना तर घाम फुटलाच. परंतु अशा दप्तर दिरंगाईची जशास तशी शिक्षा दिल्याने सगळेच अधिकारी सध्या अवाक झाले आहेत.
संबंधित कंत्राटदार कंपनीकडे याबाबतचा प्रस्ताव पाठविला होता. तसेच त्यांना रिमांडर सुध्दा देण्यात आले होते. परंतु त्यावर अद्याप कार्यवाही झाली नाही हे खरे आहे. मंत्री महोदयांनी संबंधित कार्यालयाच्या बाबत अकल्पित कृती केल्याची मात्र माहिती नाही.- संदीप रायलवार,विभाग नियंत्रक एसटी महामंडळ बुलडाणा