शमीम देशमुख, उमापूर : जळगाव जामोद तालुक्यामध्ये घाटभिंगारा व चाळीस टापरी ही गावे सातपुड्याच्या डोंगरात असून तिथे वीजपूरवठा अद्याप पोहचला नाही. शासनाने घाट भिंगारा व चाळीस टापरी येथे वीजपूरवठा होण्यासाठी विजनिर्मीतीचा प्रकल्प २०११ मध्ये सुरू केला. परंतु, यापासून वीजनिर्मिती होत नसून, हा प्रकल्प केवळ शोभेची वस्तू बनला आहे.
उमापूर येथून जवळच असलेल्या भिंगारा व चाळीस टापरी येथे वीजपूरवठा होत नाही. नागरिकांना अंधारात राहावे लागते. या गावांमध्ये वीजपूरवठा सुरू होण्याकरिता २०११ मध्ये वीजनिर्मिती प्रकल्प सुरू करण्यात आला होता. मात्र, केवळ दोन महिने हा प्रकल्प सुरू होता. त्यानंतर बंद पडला.
गत १४ वर्षांपासून वीजनिर्मीती प्रकल्प बंद आहे. तेव्हापासून हा प्रकल्प सुरू करण्याबाबत प्रयत्न करण्यात आले नाही. या ठिकाणी झालेले काम निकृष्ट स्वरूपाचे आहे. या योजनेसाठी काडीकचऱ्याचीही आवश्यकता आहे. या भागात काडीकचरा आणण्याची व्यवस`था सुद्धा करण्यात आली नाही. या वीजनिर्मिती केंद्राची दुरूस्ती करून पुन्हा सुरू करण्याची मागणी भिंगारा व चाळीसटापरी गावातील नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.