पीककर्ज वाटप करण्याच्या सूचना
बुलडाणा: जिल्हा बँकेमार्फत लाभ मिळालेल्या परंतु कर्ज वाटप न झालेल्या प्रत्येक सभासदाला संलग्न राष्ट्रीयीकृत बँकेने पीककर्ज वाटप करणे आवश्यक आहे. याबाबत सर्व राष्ट्रीीकृत बँकांनी कार्यवाही करावी, अशा सूचना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिल्या आहेत.
रत्नापूर येथे लसीकरण शिबिर
भोसा: मेहकर तालुक्यातील रत्नापूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र जानेफळच्या वतीने कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिर १० जून रोजी आयोजित करण्यात आले होते. वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल गवई यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ. स्वप्निल चव्हाण, डॉ. बाजड, सरपंच महादेव शिंदे, दाभाडे, वसंत वायाळ, माधुरी जुनगाडे, भगवान धोटे, शिवाजी राऊत, सुभाष खिल्लारे, वरमाला शिंदे, सरला वानखडे, सीमा वानखडे, कलम सितबार, सकूबाई शिंदे आदी उपस्थित होते.
सरी वरंबा पद्धतीने पेरणी करण्याचे आवाहन
मेहकर : पिकाच्या वाढीच्या व पक्वतेच्या काळात विविध कारणांमुळे पिकांच्या उत्पादनामध्ये घट येत असल्याचे आढळून येते. याकरिता शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची रुंद सरी वरंबा पद्धत म्हणजेच बीबीएफवर पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
पाण्याच्या स्रोत बळकटीकरणासाठी उपाययोजना
देऊळगाव राजा: पाण्याचा तुटवडा पडून पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये, याची यंत्रणांनी काळजी घ्यावी. पाणीपुरवठा योजनांचा सूक्ष्म आराखडा तयार करून, त्यानुसार अंमलबजावणी करावी. पाण्याच्या स्रोत बळकटीकरणासाठी आवश्यक निर्णय घेऊन उपाययोजना करण्याची गरज आहे.
झाडे लावायची तरी कोठे?
मेहकर: वृक्षलागवड उपक्रमांतर्गत तालुक्यातील ग्रामपंचायतींना उद्दिष्ट देण्यात येते. मात्र, यापूर्वीच मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले असल्याने आता अनेक ग्रामपंचायतींकडे जागाच उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे.
सोयाबीन प्रक्रिया उद्योग सुरू करा!
जानेफळ: सोयाबीन डीओसीवर प्रक्रिया करणारा एकही उद्योग नसल्याने नव्याने सुरू करावा, अशी मागणी येथील शेतकऱ्यांमधून होत आहे. केंद्र शासनातर्फे २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या प्रक्रियेचा एक भाग म्हणून सोयाबीनच्या डी.ओ.सी.वर प्रक्रिया करणारे उद्योग सुरू करणे आवश्यक आहे.
जनावरांचे संगोपन शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायद्याचे!
हिवरा आश्रम: दिवसेंदिवस गुरांची संख्या कमी होत आहे. शेतकरीही ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेती करत असल्याने बैलजोडी ठेवत नाहीत. परंतु, जनावरांचे संगोपन शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायद्याचे आहे, शेतकऱ्यांनी पशुधन सांभाळावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांना तुषार संचचा आधार
बुलडाणा: सर्वसाधारण आदिवासी शेतकरी लाभार्थींना ८५ टक्के अनुदानावर तुषार संच पुरवठा करण्यात येतो. तुषार संचाचा लाभ घेण्यासाठी शेतकरी हा अनुसूचित जमातीचा असावा, लाभार्थीकडे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र असावे. अपंग, विधवा, परित्यक्त्या लाभार्थींना प्राधान्य देण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांना तुषार संचचा आधार होत आहे.
पाणीपुरवठा योजनेची कामे थंडबस्त्यात
डोणगाव : परिसरातील काही गावांसाठी पेयजल योजना कार्यान्वित करण्याचे आदेश होते. परंतु, अनेक ठिकाणी पाणीपुरवठा योजनेची कामे थंडबस्त्यातच आहेत. राष्ट्रीय पेयजल योजना अर्धवट असून, ती सुरू होण्याचीच प्रतीक्षा आहे.
बुलडाणा तालुक्यात तीन पॉझिटिव्ह
बुलडाणा: तालुक्यात १४ जून रोजी केवळ तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने नागरिकांना दिलासा मिळत आहे. परंतु, बाधितांचे प्रमाण कमी होताच बाजारातील गर्दी आता वाढली आहे.