अजून पावसाळा सुरू झाला नाही, वादळी वारे नाही तरी देखील शहरातील वीज कधी पाच मिनिटाला,कधी पंधरा मिनिटाला गायब होते आणि कधी येते पाच,दहा मिनिटाला तर कधी तासनतास येत नाही,अशा बिकट अवस्थेत येथील नागरिक त्रस्त आहेत. शहरात सध्या विजेचा प्रश्न ऐरणीवर आहे. गेल्या आठ दिवसांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे.शहराला सुरळीत वीजपुरवठा व्हावा यासाठी शहर परिसरात ४१ राेहित्र आहेत़ त्यातील कोणत्याही राेहित्रावरील फ्युज कधी जाईल हे सांगता येत नाही. तसेच सबस्टेशन मधील बिघाड कायम सुरूच असतो. दुसरबीडकडून येणाऱ्या विजेचे खांब अनेक शेतामधून येतात़ त्यात बिघाड झाल्यास तीन तासांपेक्षा जास्त वेळ दुरुस्तीला लागतो त्यात जर पावसाळ्याचे दिवस असतील तर रात्री गेलेली वीज दुसऱ्या दिवशी दुपारी येणार,अशा अनेक समस्या वीजपुरवठा वारंवार खंडित होण्यास कारणीभूत आहेत. यावर कायमस्वरुपी उपाय योजना करण्याची गरज असताना याची साधी चर्चा होत नाही. असलेल्या समस्या आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत मांडण्याचे काम स्थानिक अधिकाऱ्यांनी नेटाने करण्याची गरज आहे. वरिष्ठ अधिकारी ऐकत नसतील तर स्थानिक राजकीय नेत्यांपर्यंतच हा विषय कसा जाईल याची काळजी घेणे गरजेचे आहे. परंतु काहीच न करता वीज बिल भरणाऱ्या नागरिकांना वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या शॉक देणे थांबविण्याची गरज व्यक्त होत आहे.
साहित्यही बदलले नाही
सिंदखेडराजा येथे सबस्टेशन होऊन तीस,पस्तीस वर्ष झाली आहेत़ तितकाच काळ हा दुसर बीड किंवा अन्य जास्त क्षमतेच्या पॉवर हाऊस वरून वीज खांब व विद्युत वाहिन्या (तार) टाकायला झालेला आहे़ तेव्हापासून आजपर्यंत तुटलेले तार बदलणे पलीकडे काहीच झाले नाही. जुन्या तारांची काही क्षमता असते ती संपून गेलेली असावी याच पद्धतीने सबस्टेशनमध्ये ही एकाचवेळी संपूर्ण नवीन वीज साधने बदललेली नाहीत़ त्या मुळेच शहरातील वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे.यावर राजकीय आणि प्रशासकीय स्तरावर काम होणे गरजेचे आहे.
मान्सून पूर्व कामे सुरू असल्याने सध्या वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. मध्यंतरी जोरदार वारे असल्यानेही अनेक अडचणी आल्या़ परंतु येत्या तीन,चार दिवसात ही कामे पूर्ण करून वीजपुरवठा सुरळीत राहील यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. बऱ्याचवेळा सबस्टेशनमध्ये ही बिघाड होतात त्याकडे आम्ही लक्ष देत आहोत.
ए. एम. खान, उपअभियंता,सिंदखेडराजा