डोणगाव : परिसरात वेळोवेळी विद्युतपुरवठा खंडित होतो़ त्यामुळे, नागरिकांना माेठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागताे़ वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी जि.प़ कृषी व पशुसंवर्धन सभापती राजेंद्र पळसकर यांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतल्याने २२ जून रोजी कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता व सहायक अभियंता यांनी भेट घेऊन येथील विद्युतसंबंधी सर्व प्रश्न येत्या १० दिवसांत सोडवण्यासंबंधी आश्वासन दिले.
डोणगाव विद्युत उपकेंद्रांतर्गत १५ गावे येतात़ मात्र, मागील काही महिन्यांपासून येथील विद्युतपुरवठ्याचा प्रश्न बिकट झाला आहे़ विद्युतपुरवठ्याची समस्या न साेडवल्यास जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पळसकर यांनी १ जुलैपासून आंदोलन करण्याचा इशारा दिला हाेता़ त्यावर २२ जून रोजी कार्यकारी अभियंता बी़ युू. जायभाये, उपकार्यकारी अभियंता प्रशांत उईके, सहायक अभियंता निलेश ठाकरे यांनी राजेंद्र पळसकर यांची भेट घेऊन डोणगाव उपकेंद्रात विद्युतपुरवठ्याविषयी समस्या जाणून घेतल्या़ या वेळी उत्तम परमाळे, विठ्ठल ताकतोडे, पत्रकार जमीर शाह, यासिन बेग आदी उपस्थित हाेते़ यावेळी राजेंद्र पळसकर यांनी डोणगावांतर्गत येणाऱ्या पांगरखेड येथील विद्युतप्रश्न मिटवण्यासाठी पांगरखेड उपकेंद्र करून त्या ठिकाणी पाॅवर हाउस करण्याची मागणी केली़ येत्या १० दिवसांत डोणगाव विद्युत उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या गावातल्या विद्युतपुरवठ्यासंबंधीच्या समस्यांचे निराकरण झाले नाहीतर विद्युत वितरणविरुद्ध आंदोलन करण्याचा इशारा यावेळी पळसकर यांनी दिला़
बॅक फिडरचे काम १० दिवसांत
यात रोहित्र बदलणे, जीर्ण तारा बदलून देणे, मागेल त्याला विद्युतमीटर, गावातील किरकोळ देखभाल दुरुस्ती ही कामे २२ जूनपासूनच सुरू करण्यात आली़ डोणगाव उपकेंद्राला असलेला ३३ केव्हीचा बॅक फिडर जो मालेगाव व लोणी गवळी येथून होता, तो सुरू करण्यासाठी कार्यकारी अभियंता यांनी येत्या १० दिवसांत बॅक फिडरचे काम पूर्ण करून देतो, अशी ग्वाही दिली़